पुण्यनगरीला ज्ञानोबा - तुकोबांच्या दर्शनाची आस : आज पालखी पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:57 PM2018-07-07T13:57:34+5:302018-07-07T14:06:15+5:30
महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान असणा-या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन आज सायंकाळी पुण्यात होत आहे.
पुणे : महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान असणा-या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन आज सायंकाळी पुण्यात होत आहे. पालख्यांंबरोबर हजारोंच्या संख्येने वारकरी शहरात येणार असून त्यांच्या स्वागताकरिता अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांच्या दर्शनाची ओढ नागरिकांना लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होती. ती आता पूर्ण झाली आहे.
विठुरायाच्या दर्शनाकरिता मैलोन मैल चा प्रवास करुन पंढरीकडे निघालेल्या वारकरी भक्त काही काळ विश्रांतीकरिता पुण्यात थांबणार आहेत. एकदा वारकरी बांधवांनी पुण्यात विश्रांती घेतली की त्यानंतर त्यांच्या सेवेत पुणेकर आनंदाने सहभागी होतात. याप्रसंगी कुणी त्यांचे पाय चेपून देतो, कुणी हातापायांना मालिश करतो, जमेल तितकी सेवा करुन विठ्ठ्ल दर्शनाचा लाभ त्या सेवेतून घ्यायचा. असा त्या सेवेमागील उद्देश. त्यांच्या स्वागताकरिता शहरातील विविध संघटना, सेवा भावी संघ, गणेश मंडळे, प्रतिष्ठान यांनी मोठ्या भक्तिभावाने तयारी केली आहे.
बाजारपेठांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहवयास मिळत आहे.रस्त्याच्या दुतर्फा खरेदीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. फेरीवाल्यांची जागा मिळविण्यासाठी धडपड सुरु असून याबरोबरच प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी कुठलीही अडचण होवू नये, रांगेत अनुउचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे भाविकांचा गोंधळ होवू नये यासाठी रांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पावसाची खबरदारी घेवून निवा-यासाठी मोठमोठे मंडप टाकण्यात आल्याने भाविकांसाठी सुरक्षित निवारा तयार झाला आहे. पत्ता चुकणा-यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. विशेषत: या सर्व मदत कार्यात विविध महाविद्यालये, त्यातील एनएसएस, एनसीसी, याबरोबरच स्थांिनक मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत.
- संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठ्ल मंदिरात विसावा घेणार आहे.
- शहरात आता सर्वत्र भक्तिमय वातावरण असून ज्या ठिकाणी दोन्ही पालख्या मुक्कामाकरिता थांबणार आहे त्या जागी सुशोभिकरण करण्यात आले आहे.
- शहरातील ज्येष्ठ नागरिक यांची विरंगुळा केंद्र, गणपती मंडळाची जागा, अभ्यासिका,अशा अनेक ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने देखील मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधवांच्या निवा-याची काळजी घेण्यात आलेली आहे.
- पालखीच्या दुस-या दोन्ही पालख्यांच्या दर्शनाकरिता भाविकांची प्रचंड गर्दी होते. याची काळजी घेवून पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कँमेराव्दारे संशयितावर वॉच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
- सोमवारी सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सासवडकडे होणार आहे. संत तुकोबांची पालखीचे प्रस्थान सोमवारी सकाळी हडपसरच्या दिशेने होईल.