बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:03 PM2019-07-04T20:03:21+5:302019-07-04T20:21:31+5:30

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली...

sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi | बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

googlenewsNext
ठळक मुद्देअश्व धावले रिंगणी : लेझीम , बॅन्ड, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वारकऱ्यांचे स्वागत 

सकाळच्या रम्य पहरी । 
अश्व धावले रिंगाणी ।।
ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष गळा ।
लाखो नयनांनी टिपला अनुपम सोहळा ।।

निमगाव केतकी: वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्यांना आनंद देणारा उत्साहीत करणारा सोहळा असतो. यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते. 
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. तोफांची सलामी देत पालखीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

शालेय विद्यार्थांनी लेजिम बँडचे प्रात्यक्षिक यावेळी सादर केले. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोळ्यातील अश्वाचे पुजन केले . त्यानंतर पालखी तळावर संत तुकाराम महारांजाच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरवात झाली.
 पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली.  त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाले.  उंच उंच पताका गगनाशी जणू स्पर्धाच करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेऊन महिलांनी रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारुन देहू पासुन आलेल्या वारकऱ्यांचा शीण घालवला. विणेकरी, टाळ-मृंदुग वादकही देहभान हरपून रिंगण सोहळ्यामध्ये धावत होते. त्याचवेळी दिंड्यांचे भजन सुरू होते. त्यामुळे पूर्ण परिसर हा तुकारामाच्या गजराने नाहून निघाला.
अश्वांनी रिंगण सोहळ्याला पाच फेऱ्या मारुन रिंगण सोहळा पूर्ण केला. रिंगण झाल्यानंतर वारकऱ्यांनी रिंगणात धावलेल्या अश्वाचे दर्शन, व माती कपाळाला लावण्यासाठी एक गर्दी केली.

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चार 
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल 

 असे म्हणत रिंगण पूर्ण होताच वैष्णवांनी विविध खेळ खेळण्यास सुरवात केली. फुगडी खेळण्यामध्ये  वैष्णव, वारकरी दंग झाले होते.
  बेलवाडी गावात सर्वत्र जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचा आंनद वरकयार्नी घेतला गावाला यात्रेचे स्वरूप आले होते ठीकठिकाणी दुकान लागले होते. त्यानंतर दुपारी हिरव्यागार शिवारातून रिंगणाचा आंनद मनात साठवत सोहळा पुढे सरकत होता. या परिसरात केळीच्या बागा, ऊसाचेमळे यामध्ये  वारकरी विश्रांती घेत होते. विश्रांती झाल्यावर पालखी बेलवाडी, शेळगाव फाटा अंथुरणे मार्गे निमगाव केतकीला पोहचली येथे देखील पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आज पालकी निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार आहे. शुक्रवारी सकाळी इंदापूर च्या दिशेने मार्गसंस्थ होणार आहे.
............
सरकारी कर्मचारी अधिकारी देखील झाले तल्लीन
रिगणं झाल्यावर वारकऱ्यांबरोबर पोलीस, महावितरण, आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील दिंड्यांचा आंनद घेत नाचत होते. सर्व ताण विसरून हे कर्मचारी रिंगण सोहळ्याचा आनंद घेत होते.

विद्यार्थ्यांचे लेझीम खेळून स्वागत
 शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे प्रात्याक्षिक सादर केले. गावात व रिंगण परिसरात रांगोळ्या काढल्या. चहा, नास्ता, जेवणाचे वाटप करण्यात मदत केली.

दिंड्याच्या गजराने भाविक झाले प्रसन्न रिंगणच्या परिसरात मनाच्या दिंड्यानी टाळ व मृदुंगाच्या गजरात नाचत अभंग गायले. सोहळ्याचा आनंद स्थानिक ग्रामस्थ, बाहेरून आलेल्या भक्तांनी घेतला. जवळपास ४० हजार लोकांनी रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

Web Title: sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.