आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:03 PM2020-06-27T14:03:40+5:302020-06-27T14:04:51+5:30
सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी होणार ,पोलीस व आरोग्य पथक सहभागी असणार
देहूगाव : आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला नेण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार असून दहा जणांनाच परवानगी मिळणार आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरीस येतात. संतांच्या पादुका घेऊन ३० जूनला दशमीच्या दिवशी दुपारी वाखरीत येतील तेथून सर्व पालख्या पंढरपूमध्ये प्रवेश करणार आहेत.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ३० जुनला पहाटे सहाच्या सुमारास दहा वारकºयांच्यासह पंढरपूकडे रवाना होणार आहेत. यासाठी शासनाने बसची व्यवस्था केली आहे. बसला फुलांची सजावट हेणार असून कापूर ओढ्या जवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल.यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत ही आरती झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाईल. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अभंग तिसºया अभंग आरतीसाठी काही वेळ थांबेल. तेथून हा सोहळा वाखरीयेथे दुपारी बाराला पोहोचेल.
वाखरीत संत भेट, चौथी अभंग आरती होईल. संस्थानच्या वतीने नैवद्यप्रसाद दाखविण्यात येईल. त्यानंतर हा सोहळा पंढरपूरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. थोरल्या पादुका येथे पाचवी अभंग आरती होईल. येथून पाच वाजण्याच्या सुमारास नगरप्रदक्षिणा, त्यानंतर पादुका मुक्कामस्थळी नेण्यात येतील. एकादशी १ जुलैला सकाळी ७ ला नगर प्रदक्षिणा, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पादुकांना परंपरेप्रमाणे चंद्रभागा चंद्रभागा स्नान घालण्यात येईल व पादुका तेथील पुंडलिक महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येतील. पुंडलिक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर पादुका वैष्णव देवता पांडूरंगाच्या द्वारदर्शनासाठी महाद्वारात नेण्यात येणार आहे. तेथे सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी हा अभंग होईल. यानंतर पादुका श्री संत तुकाराम महाराज मठामध्ये पाच दिवसांसाठी विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरा येथे काल्याचे किर्तन व काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येईल व दुपारी तीनच्या सुमारास पादुका दर्शन सोहळा पुन्हा बसने परतीच्या प्रवासाला निघेल.