देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 08:34 AM2024-06-29T08:34:05+5:302024-06-29T08:34:47+5:30
तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; राज्यभरातील दिंड्या दाखल
देहूगाव (जि. पुणे) : वरुणराजाच्या अभिषेकात टाळ-मृदंगाचा कल्लोळ, विणेचा झंकार झाला आणि आषाढी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या वैष्णवांच्या बीजमंत्राने इंद्रायणी नदीकाठची देहूनगरी विठ्ठलमय झाली.
पालखीच्या सुखसोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या आणि वारकरी देहूमध्ये गुरुवारी सायंकाळीच दाखल झाले होते. हरिभजन, कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शुक्रवारी पहाटे वारकऱ्यांनी इंद्रायणी स्नान केले. पहाटे पाचला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर साडेसहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात महापूजा झाली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवला होता.
माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान
आळंदी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माउलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीनिमित्त संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माउलींच्या आषाढी पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. प्रस्थानानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर, आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.