सांताक्लॉज राज्यात घेऊन येणार थंडीचा कडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:00 AM2022-12-20T08:00:24+5:302022-12-20T08:00:49+5:30
शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश नोंदविण्यात आले. किमान तापमान २३.४ अंश नोंदविण्यात आले.
मुंबई : डिसेंबर महिन्यात राज्यात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसांतील थंडी मॅन-दौंस चक्रीवादळाने हिरावून घेतली असली तरी मंगळवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात १० अंशापर्यंत घट होईल. शिवाय दुपारचे कमाल तापमानाही २९ अंशांपर्यंत खाली उतरेल, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने थंडीच्या पुनरागमानची शक्यता वाढली आहे. विशेषत: डिसेंबर महिन्यातील उर्वरित १०-१२ दिवसांत म्हणजे नाताळदरम्यान थंडीत चांगलीच वाढ होण्याचा अंदाज असून, वर्षाअखेरपर्यंत थंडी टिकून
राहणार आहे.
मॅन-दौंस चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानंतरच तसेच उत्तर भारतात एका पाठोमाग असलेल्या पश्चिमी झंजावाता (वेस्टर्न डिस्टरबन्सेस)च्या परिणामामुळेच महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान घसरत आहेत. सध्या ही दोन्ही तापमाने त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा २ अंशाने वाढीव आहेत. त्यात घसरण होत रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होईल.
दरम्यान, महाराष्ट्रासारखाच थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातमधील द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाडपर्यंतच्या २० जिल्ह्यात व दक्षिण मध्यप्रदेशातीलह झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुलपर्यंतच्या २० जिल्ह्यांत जाणवू शकतो, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
थंडी का वाजत नाही ?
शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश नोंदविण्यात आले. किमान तापमान २३.४ अंश नोंदविण्यात आले. हे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंशांनी अधिक होते. त्यामुळे मुंबईकरांना ऐन थंडीत उन्हाळा अनुभवास येत आहे, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरकडून देण्यात आली.
४ डिसेंबर १९८७ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.८ अंश होते.
गेल्या दहा वर्षांत ३१ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३७.३ अंश होते.
रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.५ होते.
(स्रोत : वेगरिज ऑफ दी वेदर)