संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:36 IST2025-01-06T10:35:34+5:302025-01-06T10:36:19+5:30
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण व हत्या झाली होती. यानंतर लगेचच घुले हा ११ डिसेंबरला भिवंडीत आला होता.

संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले....
मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुख्य आरोपींच्या अटकेसाठी विरोधकांसह जनतेनेही सरकारवर प्रचंड दबाव आणला होता. यातूनच मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा असलेला वाल्मीक कराड याला सीआयडीकडे शरण येण्यास भाग पाडण्यात आले होते. आता फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या आरोपींनी पसार होण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते आता समोर येऊ लागले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली होती. तिथे त्याने मुळचे बीडकर असलेल्या विक्रम डोईफोडे यांच्याकडे मदत मागितली होती. परंतू, त्यांनी नकार दिल्याने घुलेने त्यांच्या साथीदारांसह गुजरातला पलायन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण व हत्या झाली होती. यानंतर लगेचच घुले हा ११ डिसेंबरला भिवंडीत आला होता. त्यापूर्वी त्याने समाज कल्याण न्यास मार्फत काही मदत मिळते का हे पाहिले होते. तिथे त्याने जयवंत पाटील यांच्याकडे मदत मागितली. परंतू, त्यानी नकार दिला. यावेळी त्याने डोईफोडेंबाबत विचारणा केली, ते शहराबाहेर असल्याचे पाटील यांनी त्याला सांगितले. यामुळे घुले हा डोईफोडेंच्या मालकीचे असलेल्या वळपाडा येथील हॉटेलवर गेला तिथे त्याने लपण्यासाठी मदत मागितली. परंतू, तिथे त्याला नकार कळविण्यात आला. प्रसारमाध्यमांमध्ये फोटो फिरत असल्याने त्याने ओळख लपविण्यासाठी मिशी देखील कापली होती. भिवंडीत त्याने मिशी कापली होती.
मदतीची सर्व दारे बंद होत आहेत हे समजल्यावर त्याने हॉटेलमध्ये लघवीला जातो असे सांगून तिथून पलायन केले. तिथून तिन्ही आरोपी गुजरातला गेले. गुजरातमधील एका मंदिरात या लोकांनी १५ दिवस काढले, असे तपासात पुढे आले आहे.