युतीने उमदेवारी नाकारल्यास अपक्ष रिंगणात उतरणार: संतोष माने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:43 PM2019-07-18T17:43:12+5:302019-07-18T17:43:46+5:30
युतीच्या जुन्या फार्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणून आले होते.
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तर भाजप- शिवसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातारण तापले आहे. मतदारसंघात शिवसेनेचा जनसंपर्क पाहता भाजपचा उमदेवार निवडून येणे शक्य नाही, त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोडण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी संतोष माने यांनी केली आहे. अन्यथा सेनेला जय महाराष्ट्र करून अपक्ष लढण्यासाठी आपण तयार असल्याचा खुलासा सुद्धा माने यांनी केला आहे.
युतीत आगामी विधानसभा जागावाटपाचा पेच कायम असतानाच, गंगापूर मतदारसंघात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेनेचे माजी आमदार अण्णा साहेब माने यांचे पुत्र आणि युवा सेनेचे नेते संतोष माने यांनी गंगापूर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी केली असून, अन्यथा थेट अपक्ष रिंगणात उतरणारा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जागावाटप आधीच युतीत बिघाडी झाली असल्याची चर्चा आहे.
युतीच्या जुन्या फार्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणून आले होते. तर दुसरीकडे, युतीचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्र गिरीश महाजन यांनी आधीच स्पष्ट केल्याने, ह्या वेळी भाजपकडे हा मतदारसंघ राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मात्र, गंगापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागात आमदार बंब यांचा जनसंपर्क नसल्याने, या ठिकाणी सेनेचाच उमेदवार निवडणून येऊ शकतो असा दावा संतोष माने यांनी केला आहे. शिवसेनेला यावेळी जागा सोडली नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा दावा सुद्धा माने यांनी केला आहे.तर लोकसभा निवडणुकीत भाजप आमदार बंब यांनी युतीच्या उमदेवार विरोधात काम केला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी लावला.