संयोगीताराजेंना वेदोक्त पूजा करण्यापासून रोखलं, वादानंतर काळाराम मंदिरातील महंतांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:45 PM2023-03-31T22:45:55+5:302023-03-31T22:46:26+5:30
Kalaram Mandir Nashik: संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे. संयोगीताराजे यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिल्यानंतर याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, हा वाद ज्या नाशिकमधील काळाराम मंदिरत झाला, तेथील महंत सुधीरदास यांनी आता या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
या प्रकाराबाबत माहिती देताना महंत सुधीरदास म्हणाले की, कोल्हापूर राजघराण्याच्या आदरणीय संयोगिताराजे भोसले या दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्या नव्हत्या. त्यांना इथे येऊन सुमारे पावणे दोन महिने झाले. संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस ज्या दिवशी होता, त्याच्या आदल्या दिवशी त्या मंदिरामध्ये आल्या होत्या. त्यांनी मंदिर परिसराला भेट दिली. मी त्यांना मंदिराबाबत संपूर्ण माहिती सांगितली. मंदिरात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस असल्याने त्यांना आरोग्य, आयुष्य प्राप्त व्हावं, म्हणून प्रभू रामचंद्रांच्या चरणी संकल्प केला. या संकल्पामध्ये, श्रुती, स्मृती, पुराणोक्त, शास्त्रोक्त पुण्य फलप्राप्त्यर्थम असा उल्लेख मी त्या ठिकाणी केला.
ते पुढे म्हणाले की, यातील श्रुती या शब्दाचा अर्थ आहे वेदांनुसार केलेलं कर्म, स्मृती या शब्दाचा अर्थ आहे सर्व स्मृतींमध्ये सांगितलेलं फळ, हे प्राप्त व्हावं आणि पुराणोक्त फल जे आहे ते प्राप्त व्हावं. परंतु त्यांचा पुराणोक्त शब्दावर आक्षेप होता. त्यांनी सांगितलं की, महाराज आम्ही छत्रपतींच्या घराण्यातील आहोत, म्हणून आमचं पूजन हे वेदांनुसार करण्यात यावं. तेव्हा मी पूर्ण आदराने त्यांचा सन्मान राखत त्याठिकाणी असं सांगितलं की, प्रभू रामचंद्रांना कुठल्याही यजमानांचं अभिषेक पूजन हे केल्यानंतर पुरुषसुक्तानेच भगवंताचं पूजन अभिषेक केला जातो. तो शुक्ल यजुर्वेदातील ३१ व्या अध्यायातील ही मंत्ररचना आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये ही रचना आहे, त्यानुसारच आपण अभिषेक करत असतो. त्यानंतर ताई पुन्हा संकल्पाला बसल्या. सर्व पूजन केलं. प्रभू रामचंद्रांचा मी दिलेला प्रसाद त्यांनी स्वीकारला. मला ११ हजार रुपयांची दक्षिणाही दिली, अशी माहितीही महंतांनी दिली.
त्यानंतर आम्ही चर्चा करत असताना त्यांच्या मर्सिडिजपर्यंत मी त्यांना सोडायला गेलो. आम्ही छत्रपती घराण्याचा उपमर्द होईल, असं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं. काही गैरसमजातून हा विषय झाला असावा. आता आम्ही थोरले छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहोत. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगणार आहोत. छत्रपती घराणं आणि पूजारी घराणं यांचे अनेक पिढ्यांचे संबंध आहेत. काही गैरसमज झाला असेल तर प्रत्यक्ष भेटून तो दूर करण्यासाठी आम्ही मोठ्या महाराजांना सर्व निवेदन करू, असे महंत सुधीरदार यांनी सांगितले.