सप्तशृंगीच्या गडावर दरड कोसळली!
By admin | Published: June 13, 2017 02:28 AM2017-06-13T02:28:15+5:302017-06-13T02:28:15+5:30
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मंदिर परिसरात ज्या संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत त्यामध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला. कोसळलेल्या एका दगडाचे वजन अंदाजे सहाशे किलो आहे.
सप्तशृंगगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंदिराच्या जवळच असलेले दोन कडे सुटलेले असल्याने तेथे संरक्षक जाळी लावण्यात आली होती. सोमवारी चारच्या सुमारास पाऊस थांबला. पावणेपाच वाजता प्रचंड आवाजाने गड हादरला. काय होते आहे, हे कळण्याच्या आतच मंदिराच्या बाजूला सुटलेल्या दोन कड्यांपैकी एक दरड वेगाने खाली आली आणि संरक्षक जाळीत अडकली. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिरात थोडेच भाविक उपस्थित होते. ते सर्वजण तत्काळ सुरक्षित स्थळी आले. ग्रामस्थ व व्यापारी बांधवदेखील आवाजाने घाबरुन रस्त्यावर आले. परंतु दरड संरक्षीत जाळीत अडकल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरड कोसळल्यानंतर सर्वच भाविकांनी गडाखाली धाव घेतली मात्र हे दगड संरक्षक जाळीमध्ये अडकल्याचे समजताच सर्वांना हायसे वाटले.