वडिलांच्या त्रासाला कंटाळून भावंडांनी घेतले विष; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 09:09 PM2016-08-23T21:09:08+5:302016-08-23T21:09:08+5:30
गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव प्राशन केले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी समोर आली.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २३ - गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव प्राशन केले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी समोर आली.
स्वाभिमान अर्जुन गणकवार (१९) असे मयताचे नाव असून, धम्मपाल अर्जुन गणकवार (वय १६) याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, अर्जुन गणकवार हे मोलमजुरी करुन कुटुंब उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून, पैकी स्वाभिमान व धम्मपाल यांनी सोमवारी दुपारी टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव प्राशन केले. अर्जुन गणकवार यांना दारुचे व्यसन असून, ते दारू पिऊन आईला मारहाण करीत. त्यामुळे या दोघांनी त्यांना जाब विचारला. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही मुलांनी अर्जुन यांना चोप दिला. याचा राग मनात धरुन अर्जुन यांनी आपल्या भावाच्या मदतीने दोन्ही मुलांना मारहाण केली होती. दोघांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. स्वाभिमानने मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. धम्मपाल मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा ठाण्यात नोंद झाली नव्हती.