सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या ?

By admin | Published: June 13, 2016 08:45 PM2016-06-13T20:45:36+5:302016-06-14T00:53:44+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन हल्लेखोरांपैकी पुणे येथील सारंग अकोलकर यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घातल्या, अशी माहिती सीबीआयच्या तपासातून पुढे

Sarang Akolkar's Dabholkar shoots? | सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या ?

सारंग अकोलकरनेच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या ?

Next

दाभोलकर हत्येचा मुख्य सुत्रधार डॉ. तावडेच सीबीआयचा दावा :

ऑनलाइन लोकमत

पुणे/मुंबई/कोल्हापूर, दि. १३ : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन हल्लेखोरांपैकी पुणे येथील सारंग अकोलकर यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घातल्या, अशी माहिती सीबीआयच्या तपासातून पुढे आली आहे. हत्येच्या संशयावरुन अटक केलेला सनातनचा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असून तसे पुरावे सीबीआय गोळा करीत असल्याची माहिती तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी सोमवारी दिली.

सीबीआयने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली असून त्यातून आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. तावडेला अटक करण्यापूर्वी एक महिन्यापासून त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यात आला होता.

न्यायालयाच्या आदेशानंतर १ जूनला त्याच्या पनवेल येथील घरामध्ये झडती घेतल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याच्याबाबत संशय बळावल्यामुळे १० तारखेला अटक करण्यात आल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग आकोलकर याच्यासोबत तावडेचा ईमेलद्वारे संपर्क असल्याचे तपासात पुढे आले आहे. तीन ते चार ईमेल्समध्ये संशयास्पद मजकूर होता. तावडेच्या पनवेलमधील घरामध्ये झडती घेतल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधूनही काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

२००४ मध्ये कोल्हापुरात झालेल्या दाभोलकरांच्या कार्यक्रमात तावडेने त्यांच्याशी जाहीर वाद घातला होता. त्याचाही तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये अकोलकरचा नेमका ‘रोल’ काय आहे, याबाबतही तपास करण्यात येत आहे. तावडे हा पत्नी निधीसह आठ वर्षे साताऱ्यात रहात होता. त्याचा प्रेमविवाह झालेला असून तेथे तो वैद्यकीय व्यवसाय करीत होता. तर पत्नी एका रुग्णालयात नोकरी करीत असताना तिची दाभोलकरांचे बंधू देवदत्त दाभोलकर यांची सून डॉ. चित्रा प्रसन्न दाभोलकर यांच्याशी ओळख झाली होती. काही काळाने तावडे कुटुंबासह पनवेलला राहण्यास गेला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 तावडेला काढायचा होता शस्त्रांचा कारखाना अकोलकर आणि तावडेमध्ये २०० पेक्षा अधिक ईमेल्सद्वारे संपर्क झाला आहे. या दोघांनी मध्य प्रदेशामधून बेकायदा शस्त्र खरेदी करण्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली असून गावठी कट्टे आणि विदेशी अग्निशस्त्र विकत घेण्याबाबत विचारविनिमयही केल्याचे समोर आले आहे. शस्त्र निर्मितीसाठी छोटासा कारखाना टाकण्यासंदर्भात त्यांचे काही नियोजन होते का, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे एस. आर. सिंग म्हणाले.

 तिन्ही हत्यांचा सुत्रधार एकच? दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये एकसारखीच पद्धती वापरण्यात आलेली असल्यामुळे या तिन्ही घटनांमागे एकच मेंदू काम करीत असून हा तिन्ही घटनांच्या कटाचा सुत्रधार तावडे असावा, असा संशय सीबीआयला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिस महासंचालकांकडून आढावा राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी पुणे येथे तपास यंत्रणांच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दाभोलकरांसह तिनही हत्यांच्या तपासाचा आढावा घेतला. ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’च्या काही प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची हैदराबाद येथेही बैठक झाली. हे अधिकारी एका कार्यशाळेनिमित्त याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून एकत्र आहेत

‘टीम तावडे’चे लक्ष्य केवळ डॉ. नरेंद्र दाभोळकरच नव्हते, तर महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांना ते संपविणार होते. हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी १५ हजार जणांचे लष्कर उभारण्याचीही त्यांची योजना होती

ब्रेन मॅपिंग,पॉलिग्राफ टेस्ट? तावडे त्याच्या होत असलेल्या चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्यामुळे, तसेच तो प्रश्नांना अपुरी उत्तरे देत असल्यामुळे सीबीआयचे अधिकारी तावडेची ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याच्या विचारात आहेत.

Web Title: Sarang Akolkar's Dabholkar shoots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.