प्रेमाचे प्रतीक सारस लुप्त होण्याच्या मार्गावर; मागील वर्षीच्या तुलनेत संख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:17 AM2022-06-17T11:17:36+5:302022-06-17T11:18:22+5:30
सारस पक्ष्यांचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या संख्येत घट हाेत असल्याने सारसचा माळढोक होण्याची शक्यता बळावली आहे.
गोंदिया :
सारस पक्ष्यांचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या संख्येत घट हाेत असल्याने सारसचा माळढोक होण्याची शक्यता बळावली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत संख्येत घट झाली असून, संवर्धनासाठी वेळीच पावले उचलली नाही तर प्रेमाचे प्रतीक असलेले सारस पक्षी लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार व वन्यजीव, वनविभाग आणि पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ ते १६ जून दरम्यान सारस गणना करण्यात आली. गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील अनुक्रमे ७० आणि ८० ठिकाणी संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र आणि वनविभाग गोंदिया व बालाघाटच्या कर्मचाऱ्यांनी गणना केली. पक्ष्यांच्या आरामाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर पहाटे ५ वाजेपासून सकाळी १० वाजेपर्यंत थेट जाऊन गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात ३४ पक्ष्यांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांतर्गत एकूण ६४ ठिकाणी सारसचा अधिवास आहे. मागील वर्षीच्या गणनेत ३९ पक्ष्यांची नोंद झाली होती. मात्र, यंदा ५ सारस कमी झाले आहेत.
७० टीमद्वारे गणना
गणनेवर शंका नको म्हणून सारस पक्ष्यांच्या अधिवास असलेल्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतात, तलावात, नद्यांमध्ये जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधण्यात आला. प्रभारी अभिजित परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली बालाघाट जिल्ह्यातील ६० ते ७० ठिकाणी २१ गट (टीम) द्वारे गणना करण्यात आली.
या परिसरात झाली गणना
गणना करण्यासाठी एकूण ४२ चमू तयार करण्यात आल्या. या चमूमध्ये जिल्ह्यातील सेवा संस्था, हिरवळ बहुउद्देशीय संस्था, गोंदिया निसर्ग मंडळ, सातपुडा फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे एकूण ९२ स्वयंसेवक, सारस मित्र तसेच गोंदिया वनविभागातील ५० वनकर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
सारस पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून सारस संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या नावावर केवळ पुस्तक छापले.
जिल्हानिहाय संख्या
- गोंदिया : ३४
- बालाघाट : ४५
- भंडारा : ०३