दिव्यांग श्रेयाच्या शैक्षणिक प्रवासात वडिल झाले ‘सारथी’!
By admin | Published: February 15, 2017 07:45 PM2017-02-15T19:45:35+5:302017-02-15T19:45:35+5:30
तीच्या पित्याचे हे बोल... अन् त्यासाठी तीच्या शैक्षणिक प्रवासात ते झाले तीचे ‘सारथी’...
सुनील काकडे / वाशिम
ती जणू सावित्रीची लेक... तीच्या अंगी शिकण्याची आगतिकता... शैक्षणिक अभ्यासक्रमातील सगळ्याच विषयात ती पारंगत... पण, नियतीने बालपणातच तीचे दोन्ही पाय हिरावून घेतले... त्याचा शिक्षणावर मात्र तसूभरही परिणाम झाला नाही... ती शिकणार, शिकून चांगली मोठी होणार, अशी पक्की खूनगाठ मनाशी बांधलेल्या जन्मदात्याचे, तीच्या पित्याचे हे बोल... अन् त्यासाठी तीच्या शैक्षणिक प्रवासात ते झाले तीचे ह्यसारथीह्ण...
लाठी, ता. मंगरूळपीर येथे वास्तव्यास असलेल्या श्रेया राजेश सुर्वे या दोन्ही पायांनी दिव्यांग मुलीच्या शिक्षणासाठी तीच्या वडिलांकडून होत असलेले प्रयत्न निश्चितपणे वाखानण्याजोगे आहेतच; शिवाय मुलीचा गर्भातच गळा घोटणाऱ्या निर्दयी मातापित्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आहे.
सन २००६ साली पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याची तयारी सुरू असताना श्रेयाला अनोळख्या आजारात अचानकपणे दोन्ही पायांना अपंगत्व आले. मात्र, शेतकरी असलेल्या राजेश सुर्वे या तीच्या पित्याने हिंमत हारली नाही. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तीच्या शिक्षणाची तजवीज यांनी केली. श्रेयानेही वडिलांच्या या हिंमतीची परतफेड करित शिक्षणात सुरूवातीपासूनच अव्वल क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. सहाव्या वर्गासाठी तीची जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी निवड झाली होती. मात्र, केंद्रशासनाकडून मदतनिसची परवानगी आणल्यासच तीला प्रवेश मिळणार होता. वडिलांच्या मनाला ही बाब पटली नाही आणि त्यांनी श्रेयाला जिल्हा परिषद शाळेतच शिकविण्याचा निर्धार केला.
श्रेया सद्या नवव्या वर्गात शिकत असून गेल्या ९ वर्षांपासून सकाळी १०.३० वाजता तीचे वडिल राजेश सुर्वे हे तीला तीनचाकी सायकलवर ठेवून दोन किलोमिटरचा पायदळ प्रवास करत शाळेत सोडून येतात. त्यानंतर शेतातील सर्व कामे आटोपून पुन्हा सायंकाळी ४.३० वाजता ते तीला घ्यायला देखील जातात. त्यांचा हा दैनंदिन कार्यक्रम अविश्रांत सुरू आहेत. आपल्या दिव्यांग कन्येच्या शिक्षणासाठी झटत असलेल्या या पित्याचे हे कार्य खरोखरच इतरांसमोर प्रेरणादायी ठरत आहे.