सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 06:45 PM2019-12-30T18:45:15+5:302019-12-30T19:14:57+5:30
सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे.
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ही संस्था टिकून राहण गरजेचे आहे. सारथी बंद होता कामा नये ही भूमिका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात संभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक विजया पवार, राजेंद्र कोंढरे, राजंद्र कुंजीर, शांताराम कुंजीर, सारथीतील कर्मचारी, विद्यार्थी, मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे. मोठ्या संर्घषांतून ही संस्था जन्माला आली आहे. सारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू, प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. मराठा समाजातील गरीबांचा गरजूंचा फायदा होण्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. तो मूळ हेतू बाजूला राहता कामा नये. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून आणि नियुक्ती पत्रांवरून वाद सुरू आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सध्या कोणतेही निर्णय घेऊन नये त्यांतून वाद चिघळत आहे, असे छत्रपती संभाजी राजेंनी अधिकाऱ्यांना सांगितले.
...................................................................................................
कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही
डी. आर. परिहार म्हणाले की, मी कोणाताही भ्रष्टाचार केलेला नाही.माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. बार्टी संस्थेच कार्यरत असतांना मी कोणत्याही गाड्या खरेदी केल्या नाहीत. माझा अपमान करण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविला असून, कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे.
...................................................................................................