‘सारथी’ कोल्हापुरातच उभारा
By admin | Published: January 5, 2017 12:51 AM2017-01-05T00:51:50+5:302017-01-05T00:51:50+5:30
नेते, संशोधक, अभ्यासकांची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर आधारित असणाऱ्या समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कोल्हापुरातच स्थापन करावी, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नेते आणि संशोधक, अभ्यासकांनी केली आहे. अन्यथा वेळ पडल्यास आंदोलनही उभारू असा इशाराही देण्यात आला आहे.
१५ आॅक्टोबरला कोल्हापुरात महाप्रचंड असा मराठा क्रांती मोर्चा झाला. त्याआधीही जिल्हा-जिल्ह्णांतून सुरू असलेल्या मोर्चांनी वातावरण ढवळून निघाले होते. मराठा समाजासाठी आरक्षण हवेच परंतु त्याआधी काही ना काही करण्याची गरज शासनालाही जाणवली. त्यातूनच ‘बार्टी’ या संस्थेच्या धर्तीवर एखादी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘लोकमत’ने दि. १७ आॅक्टोबरला याबाबतचे हे वृत्त प्रकाशित करून या संस्थेला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ९ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था शासन स्थापन करणार असल्याचे घोषित केले. या संस्थेची रचना, स्थान, कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने मंगळवारी (दि. ३) प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदस्य डी. आर. परिहार यांची दोन सदस्यीय समिती स्थापन केली.
आता याही पुढे जात ही संस्था कोल्हापुरातच स्थापन व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सर्वपक्षीय राजकीय नेते, संशोधक, अभ्यासक यांच्याशी संवाद साधल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नावे प्रस्तावित असणारी ही संस्था कोल्हापुरातच होणे संयुक्तिक असल्याचे आग्रही मत व्यक्त करण्यात आले.
शाहू महाराजांचे नाव देण्याची होती मागणी
या संस्थेला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी ‘लोकमत’च्या याच वृत्तामध्ये करण्यात आली होती. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला बळ देण्याची भूमिका घेतली, त्याच भूमिकेतून त्यांचे नाव या संस्थेला दिले जावे, अशीही मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेत या संस्थेला शाहू महाराजांचे नाव देण्याचे निश्चित करून तशी घोषणा ९ डिसेंबरला केली.
‘लोकमत’कडून सर्वप्रथम वृत्त
‘बार्टी’ प्रमाणेच मराठा व बहुजन समाजाच्या प्रश्नांवर उपाय शोधून प्रत्यक्ष काम करणारी संस्था महाराष्ट्र शासन स्थापन करणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दि. १७ आॅक्टोबरला दिले होते. १५ आॅक्टोबरच्या मराठा मोर्चानंतर दोनच दिवसांनी शासन हे महत्त्वाचे पाऊल उचलणार असल्याचे ‘लोकमत’ने जाहीर केले होते.
...तर मुख्यमंत्र्यांना भेटू
शाहू महाराज यांच्या नावे अशा पद्धतीची संस्था स्थापन करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा स्तुत्य आहे. त्याच कोल्हापूरच्या भूमीतून शाहू महाराजांनी आपल्या कार्याने जगासमोर आदर्श उभा केला.ही संस्था कोल्हापुरातच व्हावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी त्यांच्याकडे करू.
- खासदार धनंजय महाडिक
कोल्हापुरात सर्वार्थाने योग्य
छत्रपती शाहू महाराज यांची कर्मभूमी कोल्हापूर आहे. त्यांनी केलेले प्रचंड काम दृश्यमान स्वरूपात कोल्हापुरात दिसत आहे. त्यामुळे करवीरनगरीत ही संस्था स्थापन होणे हे सर्वाथाने योग्य असून त्यांना समाजाकडून व संस्थात्मक पातळीवरही मोठे सहकार्य मिळेल.
- डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक
चांगला निर्णय
बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्थेची स्थापना करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने सुरू होणारी ही संस्था कोल्हापुरातच व्हावी, ही जनतेची मागणी आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटू. तरीही झाली नाही तर जनआंदोलन उभा करावे लागले तरी ते करू.
- आमदार हसन मुश्रीफ
पुण्यात होण्याची शक्यता
कोल्हापुरात शाहू स्मारक उभारण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. शाहूंच्या नावे उभारली जाणारी ही संस्था पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे. शाहू महाराजांना कोल्हापूरपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी पुण्यातही शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. त्याची दखल घेत ही संस्था पुण्यात उभारणे संयुक्तिक ठरेल
- आमदार सुरेश हाळवणकर
कोल्हापूरच योग्य ठिकाण
शाहू महाराज यांनी विविध समाजांना दिशा देण्याचे काम केले आहे.कोल्हापुरात इतिहास संशोधक आणि इतिहासाबाबत संशोधन करणारे अनेक तज्ज्ञ लोक आहेत. त्यामुळे एकदंरीतपणे पाहता ‘सारथी’ केंद्रासाठी कोल्हापूर हेच योग्य ठिकाण आहे. त्यादृष्टीने शासनाने विचार करावा. -आमदार सतेज पाटील
मुख्य केंद्र आणण्यासाठी प्रयत्न
सारथीचे मुख्य केंद्र हे राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत म्हणजे कोल्हापुरातच झाले पाहिजे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. या संस्थेच्या पूर्वतयारीसाठी जी समिती नेमली आहे, त्यावर कोल्हापुरातील प्रतिनिधी घेतल्यास समितीचा उद्देश सफल होईल.
- आमदार राजेश क्षीरसागर