पालखी रथासाठी सर्जा-राजा, माणिक-राजाची निवड
By Admin | Published: May 31, 2017 01:43 AM2017-05-31T01:43:58+5:302017-05-31T01:43:58+5:30
श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी लोहगाव (ता. हवेली) येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा-राजा व
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी लोहगाव (ता. हवेली) येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा-राजा व चिंबळी (ता. खेड) येथील अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक-राजा या बैलजोडींना संस्थानच्या वतीने पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देण्यात आली आहे.
संस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी बुधवारी ही घोषणा केली. या वेळी सुनीलमहाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, त्यांची चाल व काम करण्याची क्षमता
यांची पाहणी करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. या निकषांनुसार सर्व बैलजोडींचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती अभिजित मोरे यांनी दिली.
रथासाठी सेवा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १७ आणि सातारा जिल्ह्यातील एका बैलजोडी मालकाने संस्थानकडे अर्ज केले होते. सुनील मोरे म्हणाले की, पालखी सोहळ्यात पालखीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची, मानाच्या अश्वांची व नगारखान्याच्या बैलांची देखील चोख व्यवस्था ठेवली जाते. या सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, व आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाते.
सकस आहार आणि चालण्याचा सराव
भानुदास खांदवे यांच्या सर्जा व राजा या बैलांना सरकी व शेंगदाना पेंड, उडीद भरडा, मक्याचा भरडा, विलायती गवत, कडबा कुट्टी व हिरवा मका आणि उसाच्या वाढ्याची कुट्टी अशा प्रकारचा आहार दिला जात आहे. त्यांना चालण्याचा सराव दिला जात आहे. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय असल्याने बैलांना गर्दीची सवय व्हावी यासाठी त्यांना सातत्याने मानवी संपर्कात ठेवले जात आहे. रथाला जुंपल्यानंतर बैल बुजणार नाही किंवा उधळणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे.
अप्पासाहेब लोखंडे यांच्या माणिक-राजा या बैलजोडीला देखील गव्हाचा, मक्याचा भरडा दिला जात आहे. विलायती गवत, कडबा, सरकी व शेंगदाणा पेंड दिली जात असून, बैलांना चालण्याचा सरावही करून घेतला जात आहे.