सरपंचांना सहा वर्षे टाकले वाळीत
By Admin | Published: January 29, 2015 05:40 AM2015-01-29T05:40:41+5:302015-01-29T05:40:41+5:30
म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत कुणबी जातपंचायतीचा विरोध डावलून निवडणूक लढवली म्हणून सहा वर्षे वाळीत टाकल्याप्रकरणी
जयंत धुळप, अलिबाग
म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत कुणबी जातपंचायतीचा विरोध डावलून निवडणूक लढवली म्हणून सहा वर्षे वाळीत टाकल्याप्रकरणी कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल शंकर पेंढारी यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी कुणबी जातपंचायतीच्या ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल पेंढारी यांनी फेब्रुवारी २००९ मध्ये कोळे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कोळे गाव कुणबी जातापंचायातीने त्यांना विरोध केला. विरोध डावलून अमोल पेंढारी यांनी निवडणूक लढवली आणि ते सरपंच म्हणून निवडणूनही आले. याच गोष्टीचा राग धरून अमोल पेंढारी व त्यांच्या कुटुंबावर फेब्रुवारी २००९ पासून कोळे गाव कुणबी जातापंचायातीच्या मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला.
कोळे गावातील अन्य ग्रामस्थांनीही पेंढारी यांच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवू नये, तसेच संबंध ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू, अशी धमकी सर्व ग्रामस्थांना देण्यात आल्याचे अमोल पेंढारी यांनी सांगितले. पेंढारी व त्यांच्या कुटुंबीयांना समाजात पुन्हा सामील करून घेण्यासाठी २० आॅक्टोबर २०१३ रोजी म्हसळा तालुका कुणबी समाज मुख्य न्यायदान कमिटीच्या सभेमध्ये कोळे जातपंचायतीने ठराव केला. अमोल पेंडारी यांच्यावर दबाव आणून, जबरदस्तीने १० हजार रुपये दंड मागितला. तर मागील पाच वर्षांची वर्गणी ९ हजार ५२० रुपये असे एकूण १९ हजार ५२० रुपये वसूल केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.