सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:28 IST2025-01-01T06:27:25+5:302025-01-01T06:28:21+5:30
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री
मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणालाही आम्ही सोडणार नाही. कोणताही दबाव सीआयडी यंत्रणेवर कोणी आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांचे मारेकरी फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी योग्य कारवाई आम्ही करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल.
कराडविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करणार या प्रश्नात ते म्हणाले की ते पोलीस, सीआयडी ठरवतील. ते पोलिसांचे काम आहे. जे पुरावे आहेत त्यांच्या आधारे आम्ही कोणालाही सोडणार नाही. पोलिस वेळोवेळी योग्य निर्णय घेतील आणि माध्यमांना त्या विषयीची माहिती देतील.
कोणाकडे पुरावे असतील तर द्यावे -
- आपल्यावर सूड उगविण्यासाठी आपल्याला गोवले जात आहे, असे कराड याने म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही.
- आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. ज्यांना राजकारणच करायचे आहे त्यांना राजकारण लखलाभ असो.