सरपंचाच्या मुलाने चोरले ४८ सिलिंडर

By Admin | Published: May 20, 2016 01:23 AM2016-05-20T01:23:24+5:302016-05-20T01:23:24+5:30

४८ गॅस सिलिंडर टेम्पोसह लंपास करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याला फरासखाना पोलिसांनी गजाआड केले

Sarpanch's son stole 48 cylinders | सरपंचाच्या मुलाने चोरले ४८ सिलिंडर

सरपंचाच्या मुलाने चोरले ४८ सिलिंडर

googlenewsNext


पुणे : हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस एजन्सी धारकाचे तब्बल ४८ गॅस सिलिंडर टेम्पोसह लंपास करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याला फरासखाना पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरलेले सिलिंडर त्याने अवघ्या २०० ते ३०० रुपयांमध्ये विकल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपीचे वडील राजस्थानातील एका गावचे सरपंच असून, सासरे राजस्थान उच्च न्यायालयाचे सरकारी वकील आहेत.
सुनीलकुमार हनुमानराम बिष्णोई (वय ३२, रा. कलवड वस्ती, लोहगाव, मूळ रा. ओसिया, राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन मांगीलाल डांगी (रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुनीलकुमार हा एक वर्षापूर्वी डांगी यांच्याकडे नोकरीस होता. केवळ दोन आठवडे काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडली होती. डांगी यांचे सिलिंडरने भरलेले टेम्पो उभे राहतात ती जागा आरोपीला माहिती होती. गणेश पेठेतील नागझरीजवळ असलेल्या रास्तेवाड्यासमोरून त्याने टेम्पो दोरीच्या सहाय्याने चालू करून चोरून नेला होता.
टेम्पोमध्ये असलेले ४८ सिलिंडर त्याने लोहगाव येथे नेले. शेजारी, काही हॉटेलवाले तसेच फेरीवाल्यांना त्याने अवघ्या २०० ते ३०० रुपयांमध्ये हे सिलिंडर विकले. उरलले १५ सिलिंडर त्याने टेम्पोमध्येच ठेवले होते. ही घटना ५ मे रोजी घडली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. फुटेजवरून आरोपीचा माग काढून पोलिसांनी अटक केली.
चोरीचे आणि विक्री केलेले सर्व सिलिंडर जप्त करण्यात आले
आहेत.
ही कारवाई उपायुक्त सुहास हिरेमठ, वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, इक्बाल शेख, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, बापू खुटवड, विनायक शिंदे, संदीप पाटील, शंकर कुंभार, अमोल सरडे, हर्षल शिंदे, अमेय रसाळ, सागर केकाण यांच्या पथकाने केली.
पिस्तूल, काडतुसे जप्त
फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने कर्मचारी अमोल सरडे यांच्या माहितीवरून आरोपी अण्णा माणिक चव्हाण (रा. तळेगाव, मूळ रा. उस्मानाबाद) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो सध्या वापरत असलेल्या दुचाकीच्या नंबरप्लेटमुळे पोलिसांना शंका आली. त्यामुळे संशयावरून ताब्यात तपास केला असता, दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिली.
त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याचा मोठा भाऊ कायप्पा साठे याचा सोलापूर येथे सलगर वस्तीमध्ये खून झाला होता. राजकीय वादामधून त्यांचा खून झाला होता. जिवाच्या भीतीने भावाचे बेकायदा पिस्तूल जवळ बाळगून पुण्यात राहात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळील कमानीजवळ सापळा रचून अर्जुन नागनाथ साठे (रा. गोकुळ वस्ताद तालमीजवळ) याला अटक केली.

Web Title: Sarpanch's son stole 48 cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.