सरसंघचालकांनी घेतली कान्होजी आंग्रेंच्या वंशजांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:13 AM2018-03-31T05:13:34+5:302018-03-31T05:13:34+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्र वारी दुपारी १२च्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांची भेट घेतली.
अलिबाग : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्र वारी दुपारी १२च्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांची भेट घेतली. आंग्रे यांच्या अलिबागमधील घेरीया या निवासस्थानी झालेली ही भेट अत्यंत खासगी व कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले. या वेळी उभयतांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
सरसंघचालक मोहन भागवत सकाळी गेटवे आॅफ इंडिया येथून विशेष बोटीने मांडवा जेट्टीत पोहोचले. तेथून थेट आंग्रे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता.
सायंकाळी भागवत यांनी निवडक स्वयंसेवकांशी संवाद साधला. शनिवारी किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण कार्यक्रमाला भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे.