सुरेशदादांच्या स्वागतास उसळला जनसागर!

By admin | Published: September 4, 2016 01:21 AM2016-09-04T01:21:48+5:302016-09-04T01:21:48+5:30

घरकूल प्रकरणी गेली साडेचार वर्षे कारागृहात असलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची शनिवारी दुपारी जामिनावर सुटका होऊन धुळ्याहून जळगावात आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी

Sasadadas welcome usasagar! | सुरेशदादांच्या स्वागतास उसळला जनसागर!

सुरेशदादांच्या स्वागतास उसळला जनसागर!

Next

जळगाव : घरकूल प्रकरणी गेली साडेचार वर्षे कारागृहात असलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची शनिवारी दुपारी जामिनावर सुटका होऊन धुळ्याहून जळगावात आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला. मोठ्या संख्येने नागरिक चौकाचौकात जमले होते व त्यांचे स्वागत फटाक्यांची जोरदार आतषबाजी व पुष्पवृष्टीने करीत होते. ‘न भूतो न भविष्यती’, असे त्यांचे स्वागत झाले.
दळवेल, पारोळा, एरंडोल, पाळधी, बांभोरी यासह महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी जोरदार स्वागत करीत प्रेमाचा वर्षाव केला. जळगावातील आकाशवाणी चौकात अबाल वृद्धांनी प्रचंड गर्दी करीत त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचे सुपूत्र राजेश जैन यांनी जामिनाचे कागदपत्र धुळ्याचे विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या न्यायालयात अ‍ॅड. जितेंद्र निळे यांच्यामार्फत सादर केली.
प्रमोद वाणी, विनोद वाणी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये तर प्रदीप वाणी यांनी एक लाख असा एकूण पाच लाख रुपयांचा जामीन दिला. त्यानंतर कारागृह अधीक्षकांकडे जामिनावर सुटकेची कादगपत्रे सादर करण्यात आली. दुपारी १२.५५ वाजता सुरेशदादा जैन हे कारागृहाबाहेर पडले. त्यांचे कुटुंबीय आणि धुळे व जळगावातील हितचिंतकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तातडीने सुरेशदादा जैन हे जळगावकडे रवाना झाले.
जळगावच्या भूमीला नमन
सुरेशदादा जैन हे दुपारी ३.२० वाजता जळगाव शहरात कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह कारने दाखल झाले. जळगावच्या वेशीवर येताच, बांभोरी नाका येथे त्यांनी माती उचलून ललाटी लावली. त्यांच्यासोबत संघपती दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील तसेच सुरेशदादा यांचे कुटुंबीय व इतर नातेवाईक होते. जवळपास १० चारचाकींचा ताफा त्यांच्या वाहनाच्या मागे पुढे असा महामार्गावरून जात होता. खोटेनगर थांब्यानजीक ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
जैन मंदिरात पूजाअर्चा
महामार्गाजवळील दादावाडीमधील भाग्यवर्धन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात त्यांनी पूजा केली. दुपारी ३.२८ वाजता त्यांचे भाग्यवर्धन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आगमन झाले. सुमारे अर्धा तास सुरेशदादांनी या मंदिरात पूजा केली.
गुजराल पेट्रोलपंपाजवळही नगरसेवक अमर जैन व मित्र परिवार, जैन बांधवांनी सुमारे ५०० गुलाब पुष्पांचा हार सुरेशदादा यांच्या गळ््यात घातला. पुढे मानराज पार्क चौक, शिवकॉलनी चौकातही लोकांनी मोठी गर्दी केली होती.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ युवकांनी सुरेशदादांचा ताफा थांबवून त्यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)

आकाशवाणी चौकात प्रचंड गर्दी
आकाशवाणी चौकात सुरेशदादांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. सुरेशदादा यांचे आगमन होताच प्रचंड घोषणाबाजी व आतषबाजी करीत नागरिकांनी जोरदार स्वागत करीत प्रेमाची अनुभूती दिली. पेट्रोल पंपाजवळील महामार्गावर सुरेशदादा वाहनातून उतरले व त्यांनी जनतेला हात उंचावून अभिवादन केले व ते शिवाजीनगरकडे रवाना झाले.

सुरेशदादा व विजय दर्डा यांची गळाभेट...
सुरेशदादा जैन यांचे जळगावात आगमन होताच त्यांची लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी भाग्यवर्धन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी रमेशदादा जैन व कुटुंबीयही उपस्थित होते.

राजकारणात परतण्याचा तूर्त विचार नाही ! - सुरेशदादा जैन
कर्मभूमीत परतल्याचा मोठा आनंद अनुभवतो आहे. ज्या मातीत वाढलो.. तेथे साडेचार वर्षांनंतर पाय ठेवत असल्याचे मोठे समाधान लाभत आहे. स्वातंत्र्याचे मोल काय तेदेखील खऱ्या अर्थाने अनुभवले असल्याची भावना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आता थोडा थकलोही आहे. बाहेर आल्याचा आनंद उपभोगायचा आहे. सर्वांचे आपल्यावर व आपले सर्वांवर प्रेम होते व आहे. राजकारणात परतण्याचा तूर्त विचार विचार नाही, योग्यवेळी बोलेल, असे जैन यांनी सांगितले.

Web Title: Sasadadas welcome usasagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.