ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 06:25 AM2024-07-05T06:25:58+5:302024-07-05T06:27:09+5:30

येत्या मंगळवारी ससून रुग्णालय या विषयावर लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जाईल

Sassoon Hospital is Best..! The minister Hasan Mushrif said, will take the MLA and show them in personally | ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार

ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार

मुंबई - पुण्यात अलीकडे अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या ससून रुग्णालयाबाबतच्या प्रश्नावर बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयाचा दर्जा आजही अत्यंत चांगला असल्याचा दावा करून ज्यांची इच्छा आहे अशा सर्व आमदारांना त्या ठिकाणी नेऊ आणि हे दाखवून देऊ, असे विधानसभेत गुरुवारी सांगितले.

ससून रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून देणे आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासंदर्भातील प्रश्न भाजपचे भीमराव तापकीर व अन्य सदस्यांनी विचारला होता. मुश्रीफ यांनी या संदर्भात माहिती दिली. 

कर्करोग युनिट उभारणार...
ससूनमध्ये कर्करोग रुग्णालय लवकरच उभारले जाईल. त्यासाठी समोरच असलेली एमएसआरडीसीची जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपल्या विभागाची चर्चा झाली आहे, ती जागा नक्कीच मिळेल. ससूनमध्ये नवजात शिशूंसाठींच्या बेडची संख्या कमी आहे, ती वाढविली जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले. ललित पाटील या आरोपीला केलेले सहकार्य, पोर्शे दुर्घटनेतील मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले जाणे, उंदीर चावल्याने रुग्णाचा झालेला मृत्यू या घटनांमुळे ससून रुग्णालयाची बदनामी झाली आहे, हे मुश्रीफ यांनी मान्य केले. 

‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख
ससून रुग्णालय माफियांचा अड्डा बनले आहे, गुन्हेगारांच्या मुक्कामाचे ठिकाण बनले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ससूनमधील असुविधा, पुणे महापालिकेला आरोग्य प्रमुखच नसणे आदी मुद्दे उपस्थित करत रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या बातम्यांचा उल्लेख केला. ससूनमध्ये बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितले जाते याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी त्याचा इन्कार केला. 

लक्षवेधी मंगळवारी, होणार सविस्तर चर्चा
ससूनमधील घटनांसंदर्भात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत, याबाबत सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे या विषयावर स्वतंत्र लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जावी म्हणजे मला विस्ताराने उत्तर देता येईल, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही त्यासाठी आग्रह धरला. त्यावर, येत्या मंगळवारी या विषयावर लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title: Sassoon Hospital is Best..! The minister Hasan Mushrif said, will take the MLA and show them in personally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.