शेतकऱ्यांसाठी लढणारा ‘साताराभूषण’ हरपला
By Admin | Published: December 13, 2015 01:05 AM2015-12-13T01:05:59+5:302015-12-13T01:05:59+5:30
शरद जोशी यांच्या निधनाने हळहळ : संघटनेद्वारे सातारा मायभूमीत उभारली होती आंदोलने
सातारा : परदेशातील उच्च पदाची नोकरी सोडून ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी ज्यांनी उपाषणे केली, तुरुंगवास भोगला, असे शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा वाली हरपल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
एक अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे शरद जोशी यांचे सातारच्या मातीशी भावनिक नाते आहे. त्यांचे वडील दिवंगत अनंतराव जोशी हे सातारा येथे पोस्टात नोकरीस होते. ३ सप्टेंबर १९३५ रोजी शरद जोशी यांचा जन्म शनिवार पेठेत झाला. वयाच्या तीन-चार वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण साताराभूमीत गेले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता. परदेशात उच्च पदावर नोकरी केली. भारतीय टपाल सेवेत कार्यरत असताना पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत त्यांचे विशेष योगदान होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुणे येथे शेती करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी आंदोलने उभारली.शेतकऱ्यांसाठी काम करत असताना साताऱ्यात अनेक सभा झाल्या. (प्रतिनिधी)
शरद जोशी हे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने लढले. उच्च पदाची नोकरी सोडली. प्रथम स्वत: शेती केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने उभारली. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा भक्कम आधार हरपला आहे. सातारकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो.
- अरुण गोडबोले
महिलांच्या हक्कासाठी यशस्वी लढे
सातबारा उताऱ्यावर महिलांचेही नाव लागावे, यासाठी त्यांनी लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केले अन् लाखो महिलांची नावे सातबाऱ्यावर नोंदवली गेली. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, महिलांच्या संपत्ती अधिकाराची फेरमांडणी असे महिलांच्या हक्काचे लढे यशस्वी केले.