Satara Bus Accident: आंबेनळी घाटात बस कोसळून ३३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:51 AM2018-07-29T05:51:33+5:302018-07-29T05:51:49+5:30
पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला.
महाबळेश्वर/पोलादपूर : पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला. खिडकीतून बाहेर फेकले गेल्याने वाचलेल्या एकाने दरीतून वर येऊन माहिती दिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तालुक्यात राहणारे आहेत. त्या भागांत शोककळा पसरली आहे.
शनिवार, रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघाले होते. विद्यापीठाचीच बस त्यांनी घेतली होती. एकूण ३२ कर्मचारी, दोन चालक, वाहक असे ३४ जण सकाळी ७ वाजता निघाले. आंबेनळी घाट पायथ्याच्या धबधब्याजवळ त्यांनी बस थांबविली. तेथून ते महाबळेश्वरकडे निघाले. चालक प्रशांत भांबेड बस चालवत होता. धुके असल्यामुळे बसचा वेगही फारसा नव्हता. बसमध्ये सर्वजण हास्यविनोदात मग्न होते. चालक भांबेडही त्यात सहभागी होते. अशाच एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि तिथेच घात झाला. बस दाभिक टोकाजवळ उजव्या बाजूला आठशे फूट दरीत कोसळली. गाडीच्या काचा फुटून अनेक जण बाहेर फेकले गेले, तर काही जण बसखाली दबले गेले.
कृषी विद्यापीठाचे सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर झाडांचा आधार घेत ते रस्त्यावर आले. त्यांनी मोबाइलवरून विद्यापीठात फोन करून अपघाताची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
पावसाचा अडथळा
दिवसभर पाऊस पडत असल्याने खाली उतरून मृतांचा शोध घेण्यात गिर्यारोहकांना अडथळे येत होते. छिन्नविछिन्न मृतदेह त्यांनी पोत्यात गुंडाळून कसेबसे वर आणले. शोधकायामध्ये रात्री उशिरापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. बसखाली अनेक मृतदेह अडकल्याची शक्यता असल्याने पोलादपूरहून क्रेन मागविण्यात आली असून, बस बाजूला हटवून मृतदेह काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दैव बलवत्तर म्हणून वाचलो
दरवर्षी पावसाळी सहल काढण्यात येते. आठवडाभरापूर्वीच वर्षा सहलीचे नियोजन सुरू होते. काम असल्याने जावे की नको, या संभ्रमात मी होतो. शुक्रवारी सायंकाळीही मला मित्रांनी फोन करून येण्याचा आग्रह केला. मात्र, मी गेलो नाही. सकाळी साडेअकरा वाजता फोन आला आणि अपघाताची माहिती मिळताच मी हादरून गेलो. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मी वाचलो, असे विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक संतोष महादेव पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
जाणे टाळले, म्हणून वाचलो
कृषी विद्यापीठातील आणखी एक कर्मचारी प्रवीण रणदिवे यांनी पिकनिकला जाण्याचे टाळल्याने ते या अपघातातून बचावले. रणदिवे यांनी सांगितले की, माझा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता, पण तब्येत बरी नसल्याचे कारण देत, मी पिकनिकला जायचे टाळले.
मला सकाळी फोन आला, तेव्हाही मी सहकाºयांना येत नसल्याचे कळविले. पिकनिकला गेलेल्यांनी व्हॉट्सअॅपवर फोटोही पाठवले. ९ वाजेपर्यंत चॅटिंग सुरू होते. नंतर ग्रुपचा संपर्कच तुटला. दुपारी १२.३० च्या सुमारास अपघाताची बातमी कळली आणि मन सुन्न झाले, असे रणदिवे म्हणाले.
यांचे मृतदेह बाहेर काढले
विक्रांत शिंदे, सचिन गिम्हवणेकर, नीलेश तांबे, संतोष झगडे, राजेंद्र रिसबूड, संजीव झगडे, प्रशांत भांबेड, रत्नाकर पागडे, सचिन झगडे, प्रमोद शिगवण, सुनील कदम, राजाराम गावडे, प्रमोद जाधव, पंकज कदम. (अन्य तिघांची नावे समजू शकली नाहीत.)
झाडे असती तर...
आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी बस दरीत कोसळली, तो भाग पूर्णपणे निमुळता आहे. त्यामुळे अपघातानंतर बस थेट ८०० फूट खोल दरीत कोसळली. त्या ठिकाणी झाडे असती, तर बसला अडथळा निर्माण झाला असता अन् बस झाडांमध्ये अडकून राहिली असती. मात्र, दुर्दैवाने एकही मोठे झाड नसल्याने बसमधील प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले.