Satara Bus Accident: ‘त्या’ अपघाताची चौकशी त्रिसदस्यीय समितीद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:04 IST2018-08-01T00:04:18+5:302018-08-01T00:04:28+5:30
सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे.

Satara Bus Accident: ‘त्या’ अपघाताची चौकशी त्रिसदस्यीय समितीद्वारे
दापोली : सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विद्यापीठाची गाडी घेऊन सहलीसाठी जाताना झालेल्या अपघातात ३0 जण दगावले. प्रकाश सावंतदेसाई हे एकमेव बचावले आहेत.
या अपघातानंतर मिळालेली माहिती, त्याबाबतची जबानी, वाहिन्यांवरून पुढे आलेले मुद्दे या साºयामध्ये विसंगती दिसत आहे. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला, अपघातावेळी गाडी कोण चालवत होते यावर दापोलीत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता विद्यापीठाने पुढाकार घेत याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातानंतर थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेले बाबासाहेब वाघमारे व दिलीप तळेकर यांचे काय म्हणणे आहे, हे तपासले जाणार आहे. त्यांच्या मोबाइलवरूनच आपण लोकांशी, पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असल्याचे सावंतदेसाई यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीनेही माहिती घेतली जाणार आहे. विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपवले असून उर्वरित दोघांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत.
मृतांना मदत जाहीर
मुंबई : आंबेनळी घाटात मिनी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. याशिवाय पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतूनही २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकी ६ लाखांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.