Satara Bus Accident: ग्रामस्थ धावले मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 03:05 AM2018-07-29T03:05:43+5:302018-07-29T03:06:23+5:30
महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात पोलादपूरपासून २२ कि.मी. अंतरावरील दाभीळ या गावी बस दरीत कोसळल्याचे पहिले वृत्त आल्यानंतर पोलादपूरजवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले.
- प्रकाश कदम
पोलादपूर : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात पोलादपूरपासून २२ कि.मी. अंतरावरील दाभीळ या गावी बस दरीत कोसळल्याचे पहिले वृत्त आल्यानंतर पोलादपूरजवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. पण पावसामुळे या ग्रामस्थांच्या बचावकार्यात अडथळे येत होते.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील राम ढवले, दीपक ढवले, मृणाल उतेकर, विक्र ांत जाधव, सचिन डोईफोडे, बाबू ढवले, किसन ढवले, बबन उतेकर, दीपक उतेकर, रमेश मोरे आदी सुमारे ३० ते ४० जण घटनास्थळी तत्काळ पोहोचले. रस्त्यावरून काहीच दिसत नसल्याने या ग्रामस्थांपैकी १० ते १२ जण सुमारे ६०० फूट खोल दरीत उतरले.
चुराडा झालेली बस आणि छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून त्यांचा थरकापच
उडाला. अशातही ज्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा देणे गरजेचे आहे, अशांना त्यांनी उचलून दरीतून वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला; परंतु त्यास पावसामुळे यश आले नाही.
- महाबळेश्वर अॅडव्हेंचर्स आणि सह्याद्री अॅडव्हेंचर या दोन गिर्यारोहण संस्थेचे ट्रेकर्स तेथे पोहोचले. ग्रामस्थांनी त्यांना माहिती दिली आणि ट्रेकर्सनी दोर आणि अन्य गिर्यारोहण साहित्यासह दरीत उतरून रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. या अपघाताचे वृत्त महाडमध्ये पोहोचताच महाडमधील सिस्केप, सह्याद्री गिरीभ्रमण आणि कोकणकडा गिर्यारोहण संस्थेचे डॉ. राहुल वारंगे, मोहन वडके, अमोल वारंगे, प्रशांत भूतकर, चिंतन वैष्णव, योगेश गुरव, सौरभ शेठ, चिराग मेथा, अर्णव शेठ, आकाश भूतकर, प्रणव कुलकर्णी या ट्रेकर्सनी आपल्या साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली आणि रेस्क्यू आॅपरेशनमध्ये सहभागी झाले.
- त्याच सुमारास खेड येथील ट्रेकर्स पोहोचले आणि रेस्क्यू आॅपरेशन अधिक गतिमान झाले. पोलादपूर येथील यंगब्लड अॅडव्हेंचर्सचे ट्रेकर्सदेखील घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सक्रि य सहभागी झाले. पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सरकारी यंत्रणांना सत्वर माहिती दिली. तब्बल १८ शासकीय व खासगी रु ग्णवाहिका, अग्निशमन दले, पोलीस यांनी रेस्क्यू आॅपरेशनसाठी आवश्यक ती कार्यवाही केली.
१७ मृतदेह काढले
रेस्क्यू आॅपरेशनच्या वेळी कोणीही कोणाला आदेश देत नव्हते, फक्त जीव वाचविण्यासाठी काम करत होते. बसमधील प्रकाश सावंत-देसाई हे वाचले असल्याचे कळल्यावर आणि त्यांना भेटल्यावर या सर्व ट्रेकर्सना समाधान वाटले. तर संध्याकाळपर्यंत १७ मृतदेह दरीतून वर आणण्यात सर्व ट्रेकर्सना यश आले असून यातील तिघांची ओळख पटलेली नाही. संध्याकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. उर्वरित शोधकार्यातही हे सर्व ट्रेकर्स सहभागी होणार आहेत.
...यांचा शोध सुरू
१. सुयश बाळ
२. संदीप झगडे
३. दत्ताराम धायगुडे
४. संदीप सुर्वे
५. संदीप भोसले
६. जयंत चौगुले
७. राजेश बंडबे
८. संतोष जळगावकर
९. सुनील साठले
१०. रविकिरण साळवी
११. रितेश जाधव
१२. हेमंत सुर्वे
१३. राजेश सावंत
१४. रोशन तबीब
१५. किशोर चौगुले
१६. एस. आर. शिंदे
१७. सावंत
(फोंडाघाट रिसर्च सेंटर)
१८. संदीप सुवरे
१९. गोरक्षनाथ तोंडे