राज्यातील पहिला हागणदारीमुक्त सातारा जिल्हा

By admin | Published: April 27, 2017 08:03 PM2017-04-27T20:03:32+5:302017-04-27T20:03:32+5:30

अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले

Satara district is the first hapless state in the state | राज्यातील पहिला हागणदारीमुक्त सातारा जिल्हा

राज्यातील पहिला हागणदारीमुक्त सातारा जिल्हा

Next

 आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 27 -   अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करून सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले. जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून, राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला घोषित करण्यात आले.
प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शालेय अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.
जून २०१६ मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते. सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचयातींची बाबनिहाय तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती. या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला. २४ एप्रिल रोजी या अहवालावरून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यातील १,४९० ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारीमुक्त घोषित करून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी या चळवळीत सकारात्मक भूमिका घेत प्रचार व प्रसिद्धीची धुरा प्रभावीपणे राबविली. तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तज्ज्ञ चमूचा सुयोग्य वापर करून या चळवळीचा वेग राखण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रशेखर जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच जनता या सर्वांचे प्रभावी प्रयत्न व सहभाग या सर्व बाबी यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)




पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील : संजीवराजे

सातारा जिल्ह्याने नेहमीच पथदर्शी उपक्रम राबवून राज्याला मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली आहे. ह्यस्वच्छ भारत मिशनह्णच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशनची टीम, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, प्रसारमाध्यमे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश प्राप्त झाले आहे. या पुढेही जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्याचे काम जबाबदारीने पार पाडेल. या कार्यात पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.


ही चळवळ थांबणार नाही : देशमुख


जिल्हा परिषदेने हाती घेतलेली ही चळवळ हागणदारीमुक्त होईपर्यंत थांबविली जाणार नाही. यापुढेही प्राधान्याने घनकचरा व सांडपाणी या घटकांवर काम केले जाईल. कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि वहन व व्यवस्थापन याद्वारे सातारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Web Title: Satara district is the first hapless state in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.