साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 08:20 AM2022-07-01T08:20:33+5:302022-07-01T08:21:31+5:30
हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते.
नितीन काळेल -
सातारा : या जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिंदे हे ठाण्यातून निवडून येत असले तरी ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत.
यशवंतराव चव्हाण
हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्याचवेळी चीनने भारतावर आक्रमण केल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण यांना दिल्लीत बोलावून संरक्षणमंत्री केले.
बॅ. बाबासाहेब भोसले
२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाळ राहिला. भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कलेढोण (ता. खटाव) गावचे. भोसले हे सातारा जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले.
पृथ्वीराज चव्हाण
चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला. चव्हाण यांनी तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते.
एकनाथ शिंदे
शिंदे यांनी महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ठाकरे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.