नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 04:28 PM2024-04-15T16:28:44+5:302024-04-15T16:57:56+5:30
Loksabha Election 2024: सुनेत्रा पवारांवरील 'ते' विधान, इंडिया आघाडीला राज्यात किती जागा मिळतील, मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार यासारख्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उत्तरे दिली.
सातारा - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झालीय. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. हजारोंच्या संख्येने आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले. देशातील लोकांना परिवर्तन हवंय. त्याचं पहिलं पाऊल साताऱ्यातून टाकलं आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातारकारांनी केले. सध्या मोदींची शक्ती कमी करणं देशाची गरज आहे असं विधान शरद पवारांनी केले आहे.
सातारा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. शशिकांत शिंदेंना लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्यावर आरोप लावले जातेय. आपलं नाणं खणखणीत आहे. लोकांमध्ये शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे. पुरोगामी विचारांना सातारची जनता नेहमीच पाठिंबा देतात. श्रीनिवास पाटलांनाही सातारकरांनी निवडून दिले. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करतेय. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणं ही देशाची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील १० वर्ष त्यांच्याकडे राज्य आहे आणि हिशोब मला मागतात, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांना पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत विरोधकांना एकूण ६ जागा मिळाल्या होत्या. त्यात आम्हाला ४, काँग्रेसला १ तर एमआयएमला १ अशा जागा होत्या. या निवडणुकीत यंदा ६० ते ७० टक्के जागांवर आम्ही विजयी झालो तर आश्चर्य वाटणार नाही. विशेषत: विदर्भात काँग्रेसला यश मिळेल. निवडणुकीतील EVM बाबत काहींनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. त्यामुळे शंकेला जागा आहे असं दिसतं असंही शरद पवारांनी म्हटलं.
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' विधानावर स्पष्टीकरण
मी तसं बोललो नव्हतो, मला प्रश्न विचारला होता, अजित पवारांनी भाषण केले होते, त्यात मला निवडून दिले, लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या असं म्हणत पुढे त्यांनी एक वाक्य वापरलं. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती. त्यापेक्षा वेगळे काही सांगितले नाही. या देशात महिला आरक्षणाचा निर्णय राज्यात घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेत विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. संरक्षण दलात मुलींना सहभागी करून देण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची काळजी मी घेतली. कारण नसताना एखाद्या शब्दावरून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी फार यशस्वी होणार नाही असं शरद पवारांनी सांगितले.
मनोज जरांगेंना पुन्हा कधी भेटलो नाही
मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्याबद्दल आस्था आहे, परंतु त्याचं मतात किती रुपांतर होईल हे मला सांगता येणार नाही. मनोज जरांगे पाटील आणि माझी फारशी ओळख नाही, मी राज्यात फिरत असल्याने भेट नाही. मी जरांगेंना एकदाच भेटलो. आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांचा प्रश्न समजून घेण्यासाठी भेट झाली. त्यानंतर पुन्हा माझी त्यांची भेट नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज ठाकरेंचं मत परिवर्तन झालं असेल, ते अधून मधून होत असते. गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहिला तर त्यावेळची स्थिती योग्य होती, तेव्हा मुक्तपणे त्यांनी आपली मते मांडली असंही पवारांनी सांगितले.