सातारा : शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न, तरूणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:49 PM2017-09-22T12:49:17+5:302017-09-22T13:27:25+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर एका तरूणाने बुक्का टाकण्याचा प्रयत्न केला.
सातारा - रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर एका तरूणाने बुक्का टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्थळापासून त्याला ओढत बाहेर नेण्यात आले.
'रयत"मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री तावडे साताऱ्यात आले असताना हा प्रकार घडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करून मंत्री तावडे व इतर मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने जात असताना मारुती जानकर याने त्यांच्या दिशेने बुक्का फेकला. मल्हार क्रांती मोर्चाचा जानकर हा कार्यकर्ता असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
'विनोद तावडे मुर्दाबाद' अशी घोषणा देत त्यांच्यावर बुक्का टाकण्याचा प्रयत्न या तरुणाने केला केला. यावेळी भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी संबंधिताला रोखण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर फरपटतच त्याला बाहेर नेले.
यापूर्वी भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत भंडारा उधळण्यात आला होता.
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते, हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात व्यासपीठावर घुसले आणि त्यांनी तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळला आणि नामांतराचे निवेदन पत्रकंही भिरकावली. शिवाय, यावेळी 'येळकोट येळकोट जय मल्हा' अशी घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे कार्यक्रमादरम्यान एकच गोंधळ उडाला. दरम्यान, याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर दुसरीकडे, लिंगायत समाजाच्या वतीनेही महात्मा बसवेश्वरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न चिघळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.