सातबारा दुरुस्ती ठप्प
By admin | Published: November 4, 2016 04:54 AM2016-11-04T04:54:59+5:302016-11-04T04:54:59+5:30
सातबारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओडीयू-२’ (ओल्ड डाटा अपडेशन) ही प्रणाली गेल्या चार महिन्यांपासून बंद पडली आहे.
पुणे : सातबारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओडीयू-२’ (ओल्ड डाटा अपडेशन) ही प्रणाली गेल्या चार महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे हजारो सातबारा उताऱ्यांचे दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. एनआयसीचा (नॅशनल इन्फोमेर्टिक सेंटर) व महसूल कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या आहेत.
राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने ई-फेरफार ही योजना हाती घेतली आहे. गेल्या चार वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहेत. मात्र, त्यातील अडचणी सुटण्याऐवजी वाढतच आहेत. ई-फेरफार या योजनेचे संगणक प्रणालीचे काम एनआयसीला दिले आहे. मात्र, संगणकीय तांत्रिक त्रुटी दूर करण्यात अद्यापही एनआयसीला यश आलेले नाही. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मध्यंतरी सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी एनआयसीने ‘एडिट मॉडेल’ ही सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या पद्धतीने सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ आहे. (प्रतिनिधी)