पुरुषोत्तमसाठी आनी झाली ‘सैराट’
By Admin | Published: July 27, 2016 01:18 PM2016-07-27T13:18:59+5:302016-07-27T15:28:24+5:30
सैराट चित्रपटातील आर्चीची लाजरी मैत्रिण, आर्चीला सारखं काहीतरी सैराट करण्यापासून रोखण्याचा प्रवृत्त करणारी आनी यंदा पुरुषोत्तम स्पर्धेसाठी सैराट झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - सैराट चित्रपटातील आर्चीची लाजरी मैत्रिण, आर्चीला सारखं काहीतरी सैराट करण्यापासून रोखण्याचा प्रवृत्त करणारी आनी यंदा पुरुषोत्तम स्पर्धेसाठी सैराट झाली आहे. गेल्या वर्षी हुकलेला विजय मिळवायचाच असा निर्धार तिने केला आहे.
पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धने नाट्य- चित्रसृष्टीला अनेक कलाकार दिले. त्यातील ‘सैराट’मधील आनी म्हणजे अनुजा मुळे हे अगदी ताजे उदाहरण. अनुजा आयएलएस विधी महाविद्यालयात तिसºया वर्षात शिकते. यंदाच्या वर्षी आयएलएस महाविद्यालयाचा संघ पुन्हा एकदा जय्यत तयारीनिशी पुरुषोत्तममध्ये उतरला आहे. अनुजाला मिळालेल्या यशामुळे या संघाचा उत्साह आणखीनच वाढला आहे.
‘लोकमत’शी संवाद साधताना अनुजा म्हणाली, ‘‘ दोन वर्षापूर्वी आयएलएस विधी महाविद्यालयाने पुरुषोत्तममध्ये सादर केलेल्या ‘चिठ्ठी’ या नाटकात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यासाठी मला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले होते. त्यानंतर हेच नाटक वेगळ््या स्पर्धेत सादर केले. त्यातील अभिनय पाहून ‘सैराट’ सिनेमासाठी निवड करण्यात आली. पुरुषोत्तममुळे प्लॅटफॉम मिळाला,स्टेज डेअरिंग निर्माण झाले. माझ्या व्यक्तीमत्वातही कमालीचा बदल झाला. पुरुषोत्तममध्ये अभिनयाला अधिक महत्त्व असल्याने अभिनयावर पहिल्यापासूनच भर दिला.
पुरुषोत्तम स्पर्धेबाबत अनुजा म्हणाली, ‘‘जून पासूनच आम्ही पुरुषोत्तमच्या तालमींच्या तयारीला लागता. अनेक कलाकारांची सुरुवात पुरुषोत्तम मधूनच झाली त्यामुळे नवीन कलाकारांना हे एक मोठं व्यासपीठ निर्माण झाले आहे. विद्यार्थीदशेत अभ्यासाबरोबरच नाटक करणंही तितकच गरजेचं आहे. ‘चिठ्ठी ’या नाटकानंतर तितकस यश आम्हाला पुरुषोत्तममध्ये मिळालं नाही. त्यामुळे यंदा आम्ही अधिक ताकदीने तयारीला लागलो आहोत.चिठ्ठीप्रमाणे यंदाही आम्ही पुरुषोत्तम मध्ये काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत.
आयएसएस विधी महाविद्यालयाची जोरदार तयारी
पुरुषोत्तममध्ये अनेक पारितोषिके मिळविलेले महाविद्यालय असा नावलौकीक असलेलं आयएलएस विधी महाविद्यालय यंदा जोरदार तयारीला लागले आहे. जोमाने काम करुन करंडकावर नाव कोरण्याचा मानस संघाची दिग्दर्शिका सई ताम्हणकर हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.