Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:05 PM2024-10-31T19:05:59+5:302024-10-31T19:08:31+5:30
काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीचे मतदान महिनाभरावर आलेले असताना शिंदेंनी कोल्हापूर काँग्रेसला धक्का दिला. त्यावर सतेज पाटील यांनी भाष्य केले आहे.
Satej Patil Eknath Shinde News: कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जयश्री जाधव यांचा प्रवेशाने शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागरांचे बळ वाढले आहे, तर काँग्रेसला धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या राजकीय घडामोडीवर कोल्हापूर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी भाष्य करताना राजेश क्षीरसागर यांना इशारा दिला.
सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. सतेज पाटील म्हणाले, "जयश्री जाधव यांच्या निर्णयाची खंत वाटते. कारण त्यांचं कुटुंब कोल्हापुरातील एक नामांकित कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबातील व्यक्तीने असा निर्णय घेणं, हे दुर्दैवी आहे."
जयश्री जाधवांनी खुलासा केला पाहिजे -सतेज पाटील
सतेज पाटील म्हणाले, "पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले. त्या कार्यकर्त्यांना काय सांगणार? त्यांनी किमान माझ्याशी चर्चा करायला हवी होती. काय झालं माहिती नाही? त्यांच्यावर दबाव आला का? त्या खुलासा करतील त्यावेळी कळेल", असे सांगत सतेज पाटील यांनी जयश्री जाधवांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी केली.
"करेक्ट कार्यक्रमाची व्यवस्था करणार"
सत्ताधाऱ्यांकडून ऐन विधानसभा निवडणुकीत फोडाफोडी सुरू आहे. महाविकास आघाडीचा प्लॅन काय आहे? असा प्रश्न सतेज पाटलांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, "आम्ही फोडण्याची आवश्यकता नाही. त्यांची नाराजी आहे. आम्ही कुणालाही फोडणार नाही. तिथे बसून ते करेक्ट कार्यक्रम करतील, एवढी व्यवस्था मात्र मी करणार आहे", असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.