BLOG: 'सैनिक' बांगलादेशी नागरिकाला महा'राजां'समोर घेऊन आले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:09 PM2020-02-27T15:09:47+5:302020-02-27T15:17:37+5:30
डोक्यावर गोल टोपी, मेंदीने रंगवलेले केस, दाढी, टिपिकल पठाणी ड्रेस अशा वेषातला माणूस समोर दिसेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण...
>> मुकेश माचकर
'महाराज, हा घ्या तुम्हाला हवा होता तो बांगलादेशी...'
सैनिकांनी एका मनुष्याला धक्का मारून दरबारात पुढे ढकलला, जांभई देत दरबारात आलेल्या महाराजांनी गळ्यातून एक मोत्याचा कंठा काढून सैनिकांकडे भिरकावला आणि आता पुढे काय होतंय ते आम्ही सगळे धडधडत्या हृदयाने पाहू लागलो!
प्रसंगच तसा होता!
महाराजांनी बराच काळ शांततेत काढल्यानंतर अचानक आपला परप्रांतीयविरोधी अंगरखा चढवला होता, त्यामुळे सैनिकांनीही लगेच तसाच अंगरखा चढवला होता. मात्र, यावेळी महाराजांनी परप्रांताची व्याख्या विस्तारून परदेशीयांपर्यंत नेली होती.(लोक म्हणतात ईडीच्या भयाने, पण महाराज असे कशाला घाबरतात का, त्यांचं मतपरिवर्तन झालेलं असू शकतंच की) महाराजांनी आता बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडली होती. म्हणजे मोहीम जुनीच होती, पण शटर खूप दिवस पडलेलंच होतं, ते उघडलं होतं. शिवाय आपण मानवतावादीच आहोत, कोणत्याही धर्माचे किंवा देशाच्या नागरिकांचे दुश्मन नाही आहोत, फक्त आपल्या देशातल्या नागरिकांचाच देशावर अधिकार असला पाहिजे, एवढीच आपली भूमिका आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी कोणाही बांगलादेशी घुसखोराशी समोरासमोर चर्चा करण्याचा घाट घातला होता. त्यात महाराजांचा करिश्मा असा की त्यांच्या पक्षाला लोक मतं देत नसले तरी सभांना तुडुंब गर्दी असते आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा टीआरपी जबरदस्त असतो. त्यामुळे या सवालजवाबाच्या थेट वार्तांकनासाठी आम्हा वार्ताहरांची फौजच तिथे गोळा झाली होती.
तो बांगलादेशी मनुष्य सगळ्यांना दिसला तेव्हा आम्हा सर्वांनाच सगळ्यात मोठा धक्का बसला. डोक्यावर गोल टोपी, मेंदीने रंगवलेले केस, दाढी, टिपिकल पठाणी ड्रेस अशा वेषातला माणूस समोर दिसेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. हा माणूस नीट दाढी घोटलेला, शर्टपँटीतला, आमच्यातलाच एक असावा, असाच दिसत होता. सैनिकांनी (नेहमीप्रमाणे घाईगडबडीत) कुणा भलत्यालाच उचलून आणलं की काय अशी शंका सगळ्यांनाच आली. महाराजांनी तर प्रधानजींच्या कानात ही शंका व्यक्त केली. नाहीतर महाराज याला नाव विचारायचे आणि हा 'सखाराम गंगाराम सुर्वे, राहणार बाटलीबाईची चाळ, दामोदरच्या मागे, परळ' अशा काहीतरी पत्त्यावरचा मराठी मनुष्य निघायचा! प्रधानजींनी महाराजांना आश्वस्त केलं आणि महाराजांनी त्यांचा खास खर्ज लावून विचारलं, 'नाम क्या है तुम्हारा?'
'शफीक उर अश्रफ उर रहमान!'
महाराजांच्या चेहऱ्यावर सुटकेचं हसू फुललं... आम्हीही जरा सैलावलो...
'कुठून आलायस तू?'
'बारिसाल, बांगलादेश.'
'आमच्या सैनिकांनी तुला जेरबंद केलं तेव्हा तू कुठे निघाला होतास?'
'कामधंदा शोधायला.'
महाराजांच्या चेहऱ्यावर आता त्वेषपूर्ण हसू (हे त्यांचं पेटंट हसू आहे, कॉपीराइट आहे त्यांचा यावर) फुललं आणि ते आमच्याकडे वळून म्हणाले, 'माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, पाहिलंत, हा अश्रफुर का गफूर का जो कोणी आहे तो (ही काकांकडून आलेली स्टाइल आहे, याचं नाव, गाव, पत्ता सगळं त्यांना नीट माहिती आहे, पण तो किती चिरकुट आहे, हे दाखवण्यासाठी हा विस्मरणाभिनय) या देशात येतो आणि इथे बिनदिक्कत रोजगार शोधायला निघतो. तुम्ही मला सांगा. या महाराष्ट्राच्या भूमीत रोजगार तयार झाला आहे. त्यावर हक्क कुणाचा असला पाहिजे? मराठी माणसाचा. मी तर म्हणतो, मराठीही सोडा, भारतीय माणसाचा हक्क असला पाहिजे. आज देशात रोजगार शिल्लक नाहीत. हजारो लोक रोज रोजगाराला मुकतायत. बेरोजगारी शिखराला पोहोचली आहे (प्रधानजी कानात 'ईडी ईडी' म्हणतात ते आम्हालाही पुसटसं ऐकू येतं आणि लगेच महाराजांचा ट्रॅक बदलतो), तर या देशात तयार होणाऱ्या रोजगारावर हक्क कुणाचा आहे? या देशातल्या माणसाचा ना? असं असताना हा इबादुल की गफलतुल की जो कोणी असेल तो रोजगार शोधायला निघतो? त्याला रोजगार मिळतो आणि तुमचा माझा एक भाऊ बेरोजगार राहतो, उपाशी राहतो, हा न्याय आहे का? याविरोधात बोललो की आम्ही मानवताविरोधी, असंवेदनशील, कुपमंडूक वृत्तीचे ठरवलो जातो. अरे, माझ्या हिंदू बांधवांच्या हिताचं जे आहे ते मी बोलणारच!
'साहेब आपला काहीतरी गैरसमज होतोय,' तो अश्रफुल की इबादुल की कोण तो बोलला!
महाराज संतापले, 'काय गैरसमज होतोय माझा? तू बांगलादेशी आहेस आणि रोजगार शोधायला निघालास, हे खरंच आहे ना?'
'होय महाराज आणि नुसता रोजगार शोधण्याचाच माझा विचार नाही, तर कायमचं स्थायिकही होण्याचा विचार आहे.'
आता महाराज उठून उभे राहिले, रागाने लाल झाले आणि त्याचवेळी खूषही झाले, म्हणाले, 'बघा माझ्या पुरोगामी, उदारमतवादी बांधवांनो बघा. हा बांगलादेशी माणूस स्वत:च्या तोंडाने कायमचं स्थायिक होण्याचा विचार बोलून दाखवतो आहे. करायची आहे का आपल्याला आपल्या देशाची अशी धर्मशाळा?'
शफीक उर रहमान म्हणाला, 'पुन्हा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय महाराज. मी स्थायिक व्हायला चाललो आहे, कामधंद्याच्या शोधात चाललो आहे तो माझ्या देशाला, बांगलादेशाला.'
'क्काय?' हा दरबारात सामूहिक प्रश्न उमटला. महाराजांचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला. ते छद्मीपणाने म्हणाले, 'तिथे काय सोन्याचा धूर निघायला लागला का रे अश्रफुर की...'
'शफीक उर...' नाव लक्षात ठेवा माझं. माझ्या देशात सोन्याचा धूर निघत नाहीये. ते बरंच आहे म्हणा! नंतर तो लोकांच्या डोळ्यांत जाऊन त्यांना आंधळं करू लागतो. पण, ज्या अवस्थेत मी तो देश सोडला, त्या अवस्थेत तो देश राहिलेला नाही. तिथे आता गरीबाच्या पोटाला अन्न मिळेल, हाताला कामधंदा मिळेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. गरीब माणूस इज्जतीने राहील, त्याला कोणी फालतू लायनींमध्ये उभा करणार नाही, कागदपत्रं गोळा करायला पळवणार नाही, खानपानावरून जीव जाणार नाही, असं वातावरणही आहे आता तिथं. गरीब माणसाला देश नसतो, धर्म नसतो, त्याला फक्त भूक असते साहेब. ती त्याला जिथे नेईल तिथे तो जातो, पडेल ते काम करतो. जे काही खातो ते कष्टाचं खातो. तुमच्या देशाने मला भुकेला अन्न दिलं, हाताला काम दिलं, गरीब माणसांनी खूप प्रेम दिलं, भावंडं म्हणून वागवलं. इथे पैसे मोजले की सगळी कागदपत्रं मिळतात, हे तुम्हाला माहिती आहेच. मी स्वत:हून सांगितलं नसतं तर तुम्ही कागदपत्रांच्या आधारावर मला बांगलादेशी ठरवूही शकला नसतात. मी भारतीय नागरिकच ठरलो असतो. तिथेच माझा वांधा झाला आणि तुमच्या सैनिकांना सांगून मी इथे आलो. त्यांनी मला पकडून आणलेलं नाही, मी त्यांना विनंती करून इथे आलो आहे.’
डोळे विस्फारून महाराजांनी विचारलं, 'कशाला?'
'तुमच्याकडून सर्टिफिकेट घ्यायला. मी बांगलादेशी आहे असं तुम्ही म्हणालात की माझा माझ्या मायदेशात जाण्याचा मार्ग सुकर होईल. नाहीतर माझ्या आताच्या भारतीय कागदपत्रांमुळे माझेच देशवासी मला पोटासाठी बांगलादेशात शिरू पाहणारा गरीब भारतीय घुसखोर समजून परतपाठवणी करतील हो ते माझी! प्लीज महाराज मला बांगलादेशी म्हणून हेटाळा. माझ्या नागरिकत्वावर शिक्कामोर्तब करा. प्लीज!'