बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक
By admin | Published: October 23, 2016 03:24 PM2016-10-23T15:24:09+5:302016-10-23T15:24:09+5:30
संपूर्ण देशात हळद आणि बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक होत आहे.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 23 - संपूर्ण देशात हळद आणि बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक होत आहे. बेदाण्याला मागणी असलीतरी बाजार समितीत सौद्यासाठी येणाऱ्या बेदाण्याच्या आवकेत मात्र घट झाली आहे. सध्या हळदीला प्रतीक्वींटल ६८५० ते ८५३० रूपये असा दर मिळत आहे. तर बेदाण्यात हिरवा बेदाण्याला ९० ते १२० रूपये प्रतीकिलो तर काळा बेदाण्याला ४० ते ६० रूपये प्रतीकिलो दर मिळत आहे.
हळद आणि बेदाण्यासाठी सांगलीची बाजारपेठ संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सांगली बाजारपेठेत मिळणारा चांगला व दर्जेदार माल तसेच दरही योग्य असल्याने देशभरातून व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येतात. सध्या हळद व बेदाणा दोन्हींचा हंगाम नसलातरी वर्षभर आवक सुरूच असते. हळदीचा हंगाम प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिल तर बेदाण्याचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिलअखेर असतो. मात्र, दिवाळीला बेदाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापारी गणेशोत्सवाच्या दरम्यान सांगलीत येऊन माल खरेदी करत असतात. विशेषत: उत्तर भारतातील व्यापारी या कालावधीत येऊन बेदाणा खरेदी असतात.
या आठवड्यातील बाजार समितीचा आढावा घेतला असता राजापूरी हळदीची १३२७ क्वींटल आवक झाली असून गेल्या आठवड्यापेक्षा १७७२ क्वींटलने ही आवक जास्त आहे. राजापूरी हळदीला सध्या किमान दर ७ हजार ते कमाल ८ हजार ५३० रूपयांपर्यंत मिळत आहे. परपेठ हळदीची या आठवड्यात ७७९ क्विंटल आवक झाली असून ही आवक गेल्या आठवड्यापेक्षा १३३ क्वींटलने कमी आहे. सध्या किमान दर ६ हजार ८५० तर कमाल दर ७ हजार ९०० रूपयांपर्यंत मिळत आहे. राजापूरी हळदीला प्रती क्वींटल सरासरी दर ७ हजार ६०० तर परपेठ हळदीला ७ हजार ५५० रूपये दर मिळत आहे.
बेदाण्याची सांगली बाजार समितीबरोबरच तासगाव बाजार समितीत चांगली आवक होत असते. सांगलीत आठवड्यात दोन दिवस तर तासगावला तीन दिवस सौदे निघत असतात. या आठवड्यात सरासरी २०० गाड्या बेदाण्याची आवक झाली असून यात हिरव्या बेदाण्याला प्रती किलोचा दर ९० ते १२० रूपये तर काळ्या बेदाण्याला ४० ते ६० रूपये दर मिळत आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सध्यातरी खर्चाच्या प्रमाणात दर मिळत नसल्याचे चित्र आहे.