“घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले, आतापर्यंत काहीच बोललो नाही पण...”; खोक्याची बहीण भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:01 IST2025-03-14T15:59:46+5:302025-03-14T16:01:35+5:30

Satish Bhosale News: खोक्याची बहीण म्हणाली की, या प्रकरणात आजपर्यंत आम्ही समोर आलो नाही. त्याची चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. आमची विनंती एवढीच आहे की...

satish bhosale khokya sister first reaction after police bulldozer drives over a house | “घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले, आतापर्यंत काहीच बोललो नाही पण...”; खोक्याची बहीण भावुक

“घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले, आतापर्यंत काहीच बोललो नाही पण...”; खोक्याची बहीण भावुक

Satish Bhosale News: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. तत्पूर्वी सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. यानंतर आता सतीश भोसले याच्या बहिणीने भावुक होत उद्विघ्न प्रतिक्रिया दिली.

भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला कुख्यात सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला जिल्ह्यातून हद्दपार करावे, यासाठी पोलिसांनी मार्च २०२४ मध्ये बीडच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, वर्षापासून त्यावर काहीही कारवाई न करता तो धूळ खात पडून होता. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच एसडीओंना उशिराने जाग आली. त्यांनी खोक्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, खोक्या वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये जाणार असल्याने या हद्दपारीचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खोक्या भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले होते. याच खोक्याने नंतर गुन्हे केले. जर खोक्याला वेळीच हद्दपार केले असते, तर जिल्ह्यातील गुन्हे कमी झाले असते. तो आमदारांचा कार्यकर्ता असल्यानेच अभय मिळाले का? असा सवालही विरोधक विचारत आहेत.

घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले

सतीश भोसलेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी या प्रकरणात आजपर्यंत आले नव्हते. त्याची जी काही चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. जो काही अन्याय होतोय तो खरा आहे का खोटा वगैरे कळेलच. पोलिसांची चौकशी सुरू आहे. ही कायदेशीर चौकशी आम्हाला मान्य आहे. पण बुलडोझरने त्यांचे घर पाडले. २-४ तासांनी असे समजले की, त्यांचे घर पेटवून दिले. आम्हाला रात्री समजले. आम्ही सकाळी ताबडतोब इथे आलो. त्यांचे घरदार पाडण्यात आले. लहान मुलींना मारहाण झाली. त्यांच्यांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. आमची विनंती एवढीच आहे की, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हे सगळे करणाऱ्या लोकांना अटक करा, अशी मागणी खोक्या भोसलेच्या बहि‍णींनी केली. 

दरम्यान, पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वन विभागाने सतीश भोसलेल्या घरावर बुलडोजर चालवला. गुरुवारी दुपारी घर पाडण्यात आले. त्यानंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली. काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात काही जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे. इथे एक वस्ती बसलेली होती. मात्र, सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले. त्यानंतर वनविभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती. इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले. तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते. 

 

Web Title: satish bhosale khokya sister first reaction after police bulldozer drives over a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.