“आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावं लागतंय”; खोक्याच्या पत्नीचे उपोषण, मागण्या काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:00 IST2025-03-19T13:57:07+5:302025-03-19T14:00:33+5:30
Satish Bhosale Khokya News: सतीश भोसले याच्या पत्नीने नेमक्या कोणत्या मागण्या समोर ठेवल्या आहेत?

“आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावं लागतंय”; खोक्याच्या पत्नीचे उपोषण, मागण्या काय?
Satish Bhosale Khokya News: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. तत्पूर्वी सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता सतीश भोसले याच्या पत्नीने उपोषण सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खोक्याच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केले आहे. घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. ८ घरे वनविभागाने उद्ध्वस्त केली. आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे. ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले त्याचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही, तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना निर्दोष मुक्त करावे. फरार आरोपींना तात्काळ अटक करावी. माझा नवरा आमचा परिवार व पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या पत्नीने केल्या आहेत.
आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावे लागते
आमचे घर वन खात्याने उद्ध्वस्त करून टाकले आहे. आमचे पुनर्वसन करण्यात यावे. आम्हाला घरदार नाही, आमच्या लेकरांना उन्हात बसावे लागत आहे. आमचे मालक अटक झाले पुढचे आरोपी अटक झाले पाहिजे. आमच्या महिलांना मारहाण केली. गावगुंडे कोणते आहेत, त्यांना शोधून घेतला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे, असा निर्धार पत्नीने व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी या प्रकरणात आजपर्यंत आले नव्हते. त्याची जी काही चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. जो काही अन्याय होतोय तो खरा आहे का खोटा वगैरे कळेलच. पोलिसांची चौकशी सुरू आहे. ही कायदेशीर चौकशी आम्हाला मान्य आहे. पण बुलडोझरने त्यांचे घर पाडले. २-४ तासांनी असे समजले की, त्यांचे घर पेटवून दिले. आम्हाला रात्री समजले. आम्ही सकाळी ताबडतोब इथे आलो. त्यांचे घरदार पाडण्यात आले. लहान मुलींना मारहाण झाली. त्यांच्यांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. आमची विनंती एवढीच आहे की, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हे सगळे करणाऱ्या लोकांना अटक करा, अशी मागणी खोक्या भोसलेच्या बहिणींनी केली.