सतीश शेट्टींच्या पाठपुराव्याला अखेर यश, आयआरबीवरील दोषारोप; वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण १८ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:25 AM2017-12-10T05:25:54+5:302017-12-10T05:26:09+5:30
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’लगतची सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’ या टोल कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरोधात सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने आठ वर्षांनी सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केल्याने शेट्टी यांच्या खुनाच्या तपासालाही गती मिळावी, अशी मागणी होत आहे. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी सांगितले की, सतीश यांच्या खुनामागील उद्देश माहिती करून घेण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जमीन अपहार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास स्वत:कडे घेतला होता़
या गुन्ह्यात पुरावा असून दोषारोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असल्याचे व त्याच्या तपासातून हत्येचा उद्देश पुढे येण्याची शक्यता असल्याचे त्या वेळी न्यायालयात सांगितले होते़
उच्च न्यायालयाने ८ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश देऊन या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला होता़ पण त्यानंतर तीनच दिवसांत सीबीआयने खुनाच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यासाठी बी समरी फाइल केली़ त्यानंतर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने आणि पुन्हा न्यायालयात जाऊ असे वाटल्याने सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले असावे असे दिसते.
वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील सरकारी मारकीची ७३.८८ हेक्टर जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.
दोषारोपपत्रातील कलमे मवाळ?
सीबीआयच्या दोषारोपपत्रातील कलमे मवाळ वाटत आहेत. त्यात ४२० व ५११ कलमे आहेत. कलम ५११ त्यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसते़ गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचे हे कलम आहे़ दोषारोपपत्र वाचल्यानंतरच स्पष्टपणे बोलता येईल़
- संदीप शेट्टी, सतीश शेट्टी यांचे भाऊ
म्हैसकर यांच्याविरुद्ध १५ आॅक्टोबर २००९ रोजी गुन्हाही
दाखल झाला होता. १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर या दोन्हीही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपविण्यात आला.
शेट्टी हत्येच्या तपासातही गैरप्रकार झाल्याचे आरोप संदीप शेट्टी
यांनी केले होते. अगोदर एका वकिलाला अटक केली होती. पोलीस अधिकाºयांनी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा आरोपही संदीप शेट्टी करत होते. पोलिसांवर दबाव असल्याने त्यांना याचा तपास करता आला नाही़ जनआक्रोश आणि संदीप शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़