स्थायी समितीसाठी सातमकर अस्थायी

By admin | Published: March 11, 2017 04:19 AM2017-03-11T04:19:33+5:302017-03-11T04:19:33+5:30

भाजपाबरोबरील लढाईत विजय पक्का करण्यासाठी शिवसेनेने वजनदार माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र निवडून आलेले हेच दिग्गज नगरसेवक शिवसेनेसाठी

Satkar's provisional for standing committee | स्थायी समितीसाठी सातमकर अस्थायी

स्थायी समितीसाठी सातमकर अस्थायी

Next

मुंबई : भाजपाबरोबरील लढाईत विजय पक्का करण्यासाठी शिवसेनेने वजनदार माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र निवडून आलेले हेच दिग्गज नगरसेवक शिवसेनेसाठी डोईजड होत आहेत. त्यात भाजपाने हक्क सोडल्यामुळे हे बडे नगरसेवक मोठ्या पदांवरच दावा करीत असल्याने नाराज कोणाला करणार? असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला आहे. याची प्रचिती स्थायी समिती अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यावरून उडालेल्या गोंधळातून उघड झाली.
महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये चुरस होती. मंगेश सातमकर यांचे नाव जवळपास निश्चितच झाले होते. मात्र ऐनवेळी ‘मातोश्री’वरून फोन खणखणला आणि आत्तापर्यंत डावलले गेलेले ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. यामुळे सातमकर नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत रमेश कोरगावकर, मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांची नावे होती. यापैकी सायन कोळीवाडा येथील विभागप्रमुख असलेले माजी नगरसेवक हे प्रमुख दावेदार मानले जात होते.
महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्षपद यापैकी महत्त्वाचे कोणतेही पद मिळाले नसल्याने सातमकर यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे कोरगावकर अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरत असताना कोणालाही न सांगता सातमकर रागारागाने महापालिका मुख्यालयातून निघून गेले.
असा वाद शिक्षण समिती अध्यक्षपदावरूनही झाला आहे. शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शीतल म्हात्रे या इच्छुक होत्या. त्यांचाही पत्ता कट करत शुभदा गुडेकर यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने अर्ज भरला नसल्याने कोरगावकर व गुडेकर यांची बिनविरोध नेमणूक होणार आहे. (प्रतिनिधी)

असा झाला पत्ता कट
महापौर, सभागृह नेता या महत्त्वाच्या पदांवर मंगेश सातमकर यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद त्यांच्यासाठीच राखीव असल्याचे बोलले जात होते. खुद्द सातमकर यांनाही आपलेच नाव जाहीर होण्याची खात्री होती.
त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीनेच सातमकर महापालिका मुख्यालयात आले होते. सकाळपासून त्यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात ठाण मांडले होते.
परंतु मातोश्रीवरून निघालेल्या फर्मानात सातमकर यांचा पत्ता कट होऊन भांडुप येथून सलग चारवेळा निवडून आलेले रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली.

Web Title: Satkar's provisional for standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.