सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:59 AM2019-07-08T10:59:49+5:302019-07-08T11:36:31+5:30
काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत उमदेवारी न दिल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मी भाजपमध्ये जाणार आणि मला मंत्रिपद सुद्धा मिळणारच असा दावा करणाऱ्या सत्तारांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छा व्यक्त केलीच नसल्याचे दानवे म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता. विशेष म्हणजे सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र त्यांच्या प्रवेशाला सिल्लोडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना 'नो एन्ट्रीचा' सिग्नल दिला. तर सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छाच व्यक्त केली नसल्याचा दावा आता दानवे यांनी केला आहे.
भाजपमध्ये विरोध लक्षात घेता सत्तार हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा अलीकडील काळात पहायला मिळाली. या काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. मात्र याबाबतीत शिवसेनेकडून अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. तर भाजपमध्ये होत असलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतून सत्तार यांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.