सत्तारांच्या 'मातोश्री'वरील भेटीमुळे खैरेंचा 'तो' दावा ठरला फुसका बार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:41 PM2020-01-05T17:41:07+5:302020-01-05T17:45:08+5:30
मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना मातोश्री'वर येऊ देणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता.
मुंबई: शनिवारी औरंगाबादेत रंगलेल्या नाराजीनाट्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या भेटीत सत्तार यांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, गटबाजीवर सर्विस्तर चर्चा झाली. मात्र सत्तारांच्या 'मातोश्री'वरील या भेटीमुळे शनिवारी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी, मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना 'मातोश्री'वर येऊ देणार नसल्याचा केलेला दावा फुसका बार ठरला आहे.
सत्तार यांनी शिवसेना संघटनेशी गद्दारी केली. मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी हिरव्या सापाला येऊ देणार नाही, त्यांनी खरा रंग दाखवला. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांना 'मातोश्री'ची पायरी चढू देणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर शनिवारी टीका केली होती. तसेच मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना 'मातोश्री'वर येऊ देणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता.
तर उद्धव ठाकरे हे सत्तार यांना मातोश्रीवर येऊ देणार नसल्याची अपेक्षा सुद्धा खैरे यांना होती. मात्र असे असले तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांना आज मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी 20 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
त्यामुळे सत्तार यांना मातोश्रीवर येऊ देऊ नका म्हणणाऱ्या खैरेंच्या मागणीला उद्धव ठाकरेंनी महत्व दिले नसल्याचे पाहायला मिळाले. तर मी उद्या परत 5 वाजता मातोश्रीवर येणार असल्याचे सुद्धा सत्तार म्हणाले आहे. त्यामुळे खैरेंचा दावा फुसका बार ठरला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.