शनिवारवाडा कलामहोत्सव ५ मार्चला
By admin | Published: March 1, 2017 12:45 AM2017-03-01T00:45:40+5:302017-03-01T00:45:40+5:30
शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव येत्या रविवार दि. ५ मार्च रोजी शनिवारवाडा येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे.
पुणे : नृत्य आणि सुरेल संगीताच्या अनोख्या आविष्कारांनी नटलेला शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव येत्या रविवार दि. ५ मार्च रोजी शनिवारवाडा येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे. महोत्सवाचे हे यशस्वी १६वे वर्ष असून, यंदाचा महोत्सव कथकमधील नावीन्यपूर्ण प्रयोगांवर आधारित असल्याची माहिती महोत्सवाच्या संयोजिका सबिना संघवी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे व महोत्सवाच्या आयोजन समितीच्या सदस्या गायत्रीदेवी पटवर्धन, नीलम सेवलेकर उपस्थित होत्या.
शनिवारवाडा महोत्सवात रसिकांना ताल, लय, सूर, उत्कृष्ट पदन्यास यांचा सुरेख संगम अनुभविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. कथकमधील नावीन्यपूर्ण प्रयोग हे या वर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये ‘बहुकोन’ व ‘सूरतालांगिक’ हे कलाविष्कार उपस्थितांसमोर सादर केले जातील. शहराबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कथक कलाकारांचा सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. प्रेरणा देशपांडे यांच्या ‘नृत्याधाम’ या ग्रुपच्या वतीने सादर गणेशवंदनेने महोत्सवाला सुरुवात होणार असून, यानंतर ‘सूरतालांगिक’ हा नृत्याविष्कार उपस्थितांसमोर सादर होईल. कथकचे सूर, ताल, अंगीकम या तीन अंगांवर आधारित ‘सूरतालांगिक’ हा एक पारंपरिक कथक प्रकार असून, या महोत्सवाच्या निमित्ताने तो पुणेकरांसमोर सादर होईल. (प्रतिनिधी)ो
>सादर होणार ‘बहुकोन’ नृत्याविष्कार
’कदंब’ या ग्रुपच्या वतीने ‘बहुकोन’ हा नृत्यांगना कुमुदिनी लाखिया प्रस्तुत नृत्याविष्कारही या महोत्सवादरम्यान सादर होणार आहे.
ज्यामध्ये गत-गती, सुवर्ण, शिवतांडव, अभिनय व तराणा यांचा समावेश असेल. या वेळी संयुक्ता सिन्हा, रुपांशी कश्यप, मिताली ध्रुवा, भक्ती दानी, मानसी मोदी, मिहिका मुखर्जी, कृतिका घाणेकर आदी कलाकार आपली नृत्यप्रस्तुती करतील. या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन स्वत: कुमुदिनी लाखिया यांनी केले असून, अतुल देसाई यांनी संगीत, हरीश उपाध्याय यांनी प्रकाशयोजना केली आहे.