साता-यामध्ये युवकाचं अपहरण, साडेसात लाखांच्या खंडणीची मागणी
By admin | Published: March 13, 2017 07:35 PM2017-03-13T19:35:21+5:302017-03-13T19:35:21+5:30
साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचं अपहरण केल्याची घटना,युवक सहा दिवसांपासून गायब;
Next
>आॅनलाईन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 13 - साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अपहृत युवकाच्या पत्नीने क-हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुण्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संजय बळवंत सुर्वे (वय २८, रा. अभयचीवाडी, ता. क-हाड) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयचीवाडी येथील संजय सुर्वे हा युवक शेती करतो. ८ मार्च रोजी संजय व त्याची पत्नी पूनम हे दोघेजण घरी असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरी आले. संजय त्या दोघांनाही ओळखत होता. त्याने त्या दोघांना घरामध्ये घेऊन पत्नी पूनम हिला चहा बनविण्यास सांगितला. पूनम चहा घेऊन आल्यानंतर संजयने त्या दोघांची ओळख करून दिली. एकाचे नाव ऋषिकेश भंडारी तर दुसºयाचे नाव सागर असल्याचे संजयने पूनमला सांगितले. चहा दिल्यानंतर पूनम घरात गेली. काही वेळानंतर त्या दोघांनी संजयला ‘आम्हाला स्टॅण्डवर सोडून ये,’ असे सांगितले. त्यानुसार संजय त्याची दुचाकी (एमएच ५० वाय ३४४) घेऊन त्या दोघांसमवेत घरातून बाहेर पडला. ‘या दोघांना स्टॅण्डवर सोडून मी लगेच परत येतो,’ असे त्याने पूनमला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पूनमने त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूनमने संजयची विवाहीत बहीण सुलोचना यांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. ‘त्यावर आपण उद्यापर्यंत वाट बघू,’ असे सुलोचना यांनी पूनमला सुचविले. त्यामुळे पूनम जेवण करून झोपी गेली. दुसºया दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजयची बहीण अभयचीवाडी येथे आली.
संजयच्या मोबाईलवरून कोणी तरी माझ्या मोबाईलवर फोन केला होता. ‘५ लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा नाहीतर तुम्हाला जड जाईल. तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे,’ अशी त्या व्यक्तीने मला धमकी दिल्याचे सुलोचना यांनी पूनमला सांगितले. तसेच त्या व्यक्तीने ‘संजय व आम्ही पुण्यात आहे,’ असेही सुलोचना यांना सांगितले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पूनमने पुन्हा संजयच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तेव्हाही फोन बंद होता. दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पूनमला संजयच्या मोबाईलवरून अज्ञाताने फोन केला. ‘७ लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा. नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील,’ अशी धमकी देऊन त्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर पूनमने दोन दिवस संजयची वाट पाहिली. मात्र, तो घरी परत न आल्याने व त्याच्याशी संपर्कही न झाल्याने पत्नी पूनम हिने सोमवारी याबाबत कºहाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ऋषिकेश भंडारी व सागर या दोघांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार संजय राक्षे तपास करीत आहेत.