साठे महामंडळाचे महाव्यवस्थापक निलंबित
By Admin | Published: April 21, 2015 02:22 AM2015-04-21T02:22:15+5:302015-04-21T02:22:15+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सध्याचे महाव्यवस्थापक आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक एस.के.बावणे यांना निलंबित करण्यात आले.
यदु जोशी, मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सध्याचे महाव्यवस्थापक आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक एस.के.बावणे यांना निलंबित करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव ऊज्ज्वल उके यांनी ही कारवाई केली.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या घोटाळ्यांप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सूत्रे हलली. तब्बल ११ व्यवस्थापकांना निलंबित करण्यास महामंडळाच्या काही व्यवस्थापक आदींचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विभागीय अधिकारी अनिल मस्के आणि गिरी हेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
बावणे आणि ११ बड्या अधिकाऱ्यांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महामंडळात झालेल्या घोटाळ्यांचा विस्तृत अहवाल विद्यमान प्रभारी व्यवस्थापकीय संचालक यशवंत मोरे यांनी तयार करून राजकुमार बडोले यांना दिला तेव्हा तेही चक्रावून गेले.
रमेश कदम यांची आधीच एसीबी चौकशी
महामंडळात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे (जि. सोलापूर) आमदार रमेश कदम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) आधीच चौकशी सुरू आहे. त्यांच्या खुल्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तेव्हा सर्वप्रथम ‘लोकमत’ने हे वृत्त दिले होते. आपल्या सूतगिरणीसह विविध ठिकाणी कोट्यवधी रुपये वळते केल्याचा आरोप आहे.