अकोल्यात राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन शनिवारपासून
By admin | Published: January 28, 2017 02:19 AM2017-01-28T02:19:23+5:302017-01-28T02:19:23+5:30
जय्यत तयारी सुरु; वसंत आबाजी डहाके संमेलनाध्यक्ष.
अकोला, दि. २७-अकोला येथे २८, २९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला शनिवार, २८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे संमेलनाध्यक्ष आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांंपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. अकोला येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी होणार असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्यासह आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रकाश महाराज वाघ, हभप आमले महाराज, खासदार संजय धोत्रे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, जिल्हाधिकारी जी. ङ्म्रीकांत, आ. रणधीर सावरकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, डॉ. गजानन नारे, डॉ. सुभाष सावरकर व अशोक पटोकार आदी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अभय पाटील हे असून, या संमेलनात राज्यभरातून संत साहित्यिक, लेखक, समीक्षक, व्याख्याते राष्ट्रीय कीर्तनकार, कवी, भजन गायक, कलावंत, नाटककार, ज्येष्ठ पत्रकार आदींची मांदियाळी राहणार आहे. सामुदायिक ध्यान व चिंतन, योग शिबिरानंतर ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. हभप रामधन महाराज, डॉ. भाष्करराव विघे, किसनराव पारिसे, रमेशचंद्र सरोदे यांना ग्रामगीता गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच प्रा. गोपाल मानकर व ङ्म्रीकृष्ण डंबेलकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाईल. दुपारी चारित्र्य संपन्न समाज घडविण्यासाठी महिलांची भूमिका तसेच शेतीचे अनर्थकारण या विषयावर परिसंवाद होणार आहे. संध्याकाळी चला अकोल्याची हवा येऊ द्या व कविसंमेलन होत आहे. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, अँड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकरकर, डॉ. राजीव बोरकर, श्रीपाद खेडकर, अभिजित राहुरकर व डॉ. रामेश्वर लोथे आदींनी केले आहे.