महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी

By admin | Published: July 24, 2015 11:55 PM2015-07-24T23:55:58+5:302015-07-25T01:13:31+5:30

प्राथमिक बैठकही पूर्ण : भाजप-ताराराणी आघाडीस शह देण्यासाठी एकत्र येण्याची व्यूहरचना

For Satyaj-Mushrif-Korchechi Gatti for Municipal Corporation | महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी

महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर -महापालिकेच्या राजकारणात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची गट्टी जमणार आहे. भाजपने ताराराणी आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने हे तीन मातब्बर नेते एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. सतेज पाटील परदेशात जाण्यापूर्वी यासंबंधी मुंबईत प्राथमिक बैठकही झाल्याचे समजते.
आता महापालिकेच्या राजकारणात मुश्रीफ व कोरे एकत्रच आहेत. जिल्हा बँक व बाजार समितीतही या दोघांनी एकमेकांच्या ‘सोयीचे राजकारण’ केले आहे. जिल्हा बँकेत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना मुश्रीफ यांनी संधी दिल्याने कोरे यांना ते रुचले नाही. त्यामुळे त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली. परंतु, त्यातून त्यांच्यात दुरावा येण्याचे कारण नाही. मुश्रीफ यांचा भाजपसह चंद्रकांतदादा पाटील यांना विरोध आहे. कारण जिल्हा बँकेत मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला सुरुंग लावण्याचा दादांचा प्रयत्न होता. सतेज पाटील व कोरे यांचाही महाडिक यांच्या राजकारणाला थेट विरोध आहे. त्यामुळेच हे तिघे एकत्र येण्यात फारशी अडचण नाही. राष्ट्रवादीची महापालिकेची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे असली तरी या पक्षात महाडिक व मुश्रीफ असे दोन छुपे गट तयार झाले आहेत. ज्यांना मुश्रीफ यांचा आशीर्वाद आहे, ते महाडिक यांच्याकडे जाण्याची शक्यता फारच धुसर आहे. शिवाय खासदार महाडिक राष्ट्रवादी म्हणून स्वतंत्र लढण्यापेक्षा ‘ताराराणी’च्या पंखाखाली जाण्याची जास्त शक्यता आहे.
लाचप्रकरणात अडकलेल्या माजी महापौर तृप्ती माळवी यांना ताराराणी आघाडीच्याच म्होरक्यांनी पाठबळ दिल्याचे जगजाहीर आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीची बेअबू्र झालीच, शिवाय मुश्रीफ यांचेही माळवी ऐकत नाहीत, असे चित्र लोकांना पाहायला मिळाले. त्याचाही राग मुश्रीफ यांना आहे. त्यामुळे या तिघांची आघाडी झाल्यास अत्यंत काटाजोड लढत होऊ शकते. कारण कुटनीतीचे राजकारण करण्यात हे तिघेही ‘वस्ताद’ आहेत.
गेल्या निवडणुकीतही सतेज पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर आपले काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या छावणीत पाठविले होते. आता तसे न होता या तिघांचीही छावणी एकच असू शकेल. आताच्या घडामोडी तशाच आहेत.

क्षीरसागर यांचे काय...?
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व भाजपमध्ये सध्या जो राजकीय संघर्ष सुरू आहे, त्यामागे महापालिकेचेच राजकारण आहे. आमदार महादेवराव महाडिक यांची मदत घेऊन भाजप जर महापालिकेत सत्तेत आला, तर विधानसभेला क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने भाजप हाच आजचा ‘प्रथम क्रमांकाचा शत्रू’ आहे. क्षीरसागर यांनी आता स्वबळावर लढायची जोरदार तयारी केली आहे. त्यांचे आणि सतेज पाटील यांचे विधानसभेला ‘बावडा’ कनेक्शन असते. एकमेकांचे राजकीय हित त्यांच्याकडून सांभाळले जाते. त्यामुळे सतेज-मुश्रीफ-कोरे या आघाडीत क्षीरसागर थेट सहभागी झाले नाही, तरी त्यांच्याशी पडद्याआड काही ‘अंडरस्टँडिंग’ होऊ शकते. तशा हालचाली सुरू झाल्याचीही चर्चा शहरात आहे.

‘कोल्हापूर
उत्तर’चा तिढा..
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक हे ‘एकाच म्यान्यात दोन तलवारी’ कशा ठेवणार हा प्रश्नच आहे. कारण भाजपतर्फे महेश जाधव हे उमेदवार असतील, तर काँग्रेसतर्फे सत्यजित कदम. गेल्या निवडणुकीत कदम यांनी जोरदार लढत देऊन दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ४७ हजार मते मिळविली. त्याचवेळी त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचा आमदार महाडिक यांचा आग्रह होता; परंतु कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी त्यास नकार दिला; अन्यथा भाजपची लाट व कदम यांची स्वत:ची २०-२५ हजार मते या ताकदीवर ते आमदार झाले असते. आताही हा पर्याय बंद झालेला नाही. कदम यांनी ताराराणी आघाडीतून लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यासंबंधीच्या घडामोडींना पुष्टीच मिळत आहे. विधानसभेला सत्यजित कदम हेच भाजपचे उमेदवार ठरल्यासही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

प्रभाग रचनेनंतरच घडामोडी
प्रभाग रचना झाल्याशिवाय कोण कुठे लढणार, याचे चित्र स्पष्ट होणार नाही. आतापासूनच संभाव्य इच्छुकांनी संपर्क साधला व प्रभाग रचनेनंतर त्यांना उमेदवारी देण्यात अडचण आली तर उगीच ते लोक नाराज होतात. त्यामुळे प्रभाग रचना झाल्यावर यासंबंधीच्या घडामोडींना निर्णायक स्वरुप येईल.
पक्षीय बलाबल
पक्षसंख्याबळपैकी
अपक्षांचा पाठिंबा
काँग्रेस३३०२
राष्ट्रवादी२६०१
शिवसेना-भाजप आघाडी०९०२
जनसुराज्य आघाडी०९०५
स्वीकृत सदस्य : ०५

Web Title: For Satyaj-Mushrif-Korchechi Gatti for Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.