Maharashtra Politics: “पक्षातील नेत्यांनी...” ; बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:49 PM2023-02-07T15:49:29+5:302023-02-07T15:50:15+5:30
Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अलीकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
विधीमंडळ नेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून हे पाऊल बाळासाहेब थोरात यांनी उचलल्याचे बोलले जाते आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजपचे नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे
मीडियाशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे, असे सत्यजित तांबे म्हणाले. याशिवाय सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ही व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही, मात्र त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ का आली? यावर विचार व्हायला हवा, असे सुधीर तांबे म्हणाले.
दरम्यान, जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे. पक्षासाठी समर्पित भावनेने काम करत असताना त्यांना विश्वासात न घेणे किंवा एखाद्या निर्णयात सहभागी करुन न घेणे, हे योग्य नाही. ते विधिमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती, असे मला वाटते. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात ज्यांनी नेतृत्व केले. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केले. याबाबत पक्षश्रेष्ठींनी गंभीर होऊन विचार केला पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"