“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:26 PM2024-04-17T17:26:58+5:302024-04-17T17:29:08+5:30

Satyajeet Tambe News: विशाल पाटील यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election 2024 | “अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

Satyajeet Tambe News:सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तरीही या जागेसाठी काँग्रेस अद्यापही आग्रही आहे. ठाकरे गटाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. या घडामोडींमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. विशाल पाटील यांनी एक काँग्रेस व एक अपक्ष असे दोन फॉर्म भरले. यावरून ठाकरे गट आणि काँग्रेमध्ये तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

सत्यजित तांबे यांनी एक्सवर एक पोस्ट करत विशाल पाटील यांना एक संधी मिळायला हवी असे म्हटले आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये सत्यजित तांबे म्हणतात की, विशालदादा, ऑल द बेस्ट! विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झाला आहे, हे फक्त त्यांचा संघर्ष माहिती असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. 

अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी

पुढे सत्यजित तांबे म्हणतात की, वसंतदादा पाटील यांचे या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजिनियर तयार होत आहेत. विशाल पाटील हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाने उमेदवार मागे घेतल्यास काँग्रेसचा एबी फॉर्म विशाल पाटील यांच्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच ठाकरे गटाने ती जागा लढवायचीच असे ठरवले आहे. अशावेळेस त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांना जे चांगले वाटत आहे, ते करतील, असे आम्हाला वाटते. ठाकरे गटाने बदलाचा निर्णय घेतला नाही आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली, तर विशाल पाटील यांना आम्ही समजवू आणि माघार घ्यायला सांगू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.