Maharashtra Politics: “आमच्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, मग माझ्यावर अन्याय का केला?”: सत्यजित तांबे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:14 PM2023-03-01T19:14:23+5:302023-03-01T19:15:34+5:30
Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते, असे सांगत झालेल्या प्रकारावर सत्यजित तांबेंनी खंत व्यक्त केली.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाला आहे. यातच आता आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी १०० वर्षे दिली. मात्र, माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला, असे विचारत नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली.
माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचे उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील माझ्याकडे उत्तर नाही. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते. मला अपेक्षा होती की, काँग्रेसकडून मला तिकीट मिळेल. पण तसे घडले नाही. त्यामुळे अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि मी जिंकूनही आलो. माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी १०० वर्षे दिली. मात्र त्याच पक्षाने मला स्पष्टिकरणाची एकही संधी न देता कारवाई केली, असेही सत्यजित तांबे म्हणाले.
आमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची दुही माजलेली नाही
ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे आमच्या कुटुंबात दुही माजली आहे अशा काही बातम्याही पसरवल्या गेल्या. खास करून बाळासाहेब थोरात नराज आहेत, ते वेगळा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. मात्र, आमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची दुही माजलेली नाही. आम्ही कालही एकसंध होतो आणि आजही आहोत, असेही सत्यजित तांबे यांनी नमूद केले. तसेच एच. के. पाटील यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली होती. ए. बी. फॉर्म कुणाला द्यायचा नाही. माझे नावच काँग्रेसचा उमेदवार म्हणून येणार होते. शेवटच्या क्षणी ते जाहीर करायचे हे ठरले होते. बाळासाहेब थोरात यांनाही याची कल्पना होती. मात्र अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी माझ्या वडिलांचे नाव दिल्लीतून जाहीर झाले. माझ्याशी बोलणे झाले होते त्याप्रमाणे एच.के. पाटील यांनी माझे नाव असावे यासाठी खूप चर्चा केल्या, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. पण काहीही झाले नाही. पुढे एबी फॉर्मही चुकीचा आला त्यानंतर काय घडले ते सर्वांना माहिती आहे, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.
दरम्यान, पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि ते निवडणूक जिंकलेही आहेत. माझ्यासोबत काय घडले ती खूप मोठी गोष्ट आहे. ती मी नंतर कधीतरी सांगेन. मला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली कारण माझ्यापुढे काही पर्यायच उरला नाही, असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"