हायकोर्टात रंगली ‘सत्यनारायण कथा’!
By admin | Published: February 24, 2015 04:39 AM2015-02-24T04:39:02+5:302015-02-24T04:39:02+5:30
धर्मनिरपेक्षतेवर न्यायदान करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी सत्यनारायणाची महापूजा चांगलीच रंगली. या पूजेला काही ज्येष्ठ न्यायाधीशांनीही हजेरी लावली़
मुंबई : धर्मनिरपेक्षतेवर न्यायदान करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी सत्यनारायणाची महापूजा चांगलीच रंगली. या पूजेला काही ज्येष्ठ न्यायाधीशांनीही हजेरी लावली़ संध्याकाळी हायकोर्ट आवारात गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. विशेष म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर एकीकडे अंत्यविधी होत असताना दुसरीकडे न्यायमंदिरात पूजेचा रंग चढत होता.
महत्त्वाचे म्हणजे ही पूजा मोठा स्टेज उभारून उच्च न्यायालयाच्या आवारात मुख्य इमारतीसमोर झाली़ त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा गाण्यांचा कार्यक्रमही साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता़ न्यायालयाच्या आवारात काहीही आयोजित करायचे असल्यास त्याला मुख्य न्यायाधीशांची परवानगी लागते़ त्यामुळे तशी रीतसर परवानगी घेऊनच येथील कर्मचाऱ्यांनी या सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते़ विशेष म्हणजे, ही पूजा होण्याची ही पहिलीच वेळ नसून गेली अनेक वर्षे ही पूजा येथे होते़ शनिवारच्या या पूजेला न्या़ सत्यरंजन धर्माधिकारी, न्या़ राजेश केतकर व न्या़ के.के. तातेड यांनी हजेरी लावली होती.